चिखलदरा (अमरावती) : तालुक्यात १८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या २६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रचाराची रंग चढू लागली आहे. थेट सरपंचपदासाठी रक्ताच्या नात्यांना नात्यागोत्याचा विसर पडला आहे. तालुक्यातील आदिवासी नेत्यांच्या गावातील अस्तित्वाची लढाई पाहता, रस्सीखेच सुरू झाली आहे. सरपंचपद आदिवासींसाठी राखीव असल्याने मेळघाटच्या धारणी चिखलदरा तालुक्यात उपसरपंचपदासाठी सुद्धा तेवढीच रंगत महत्त्वाची ठरणार आहे
तालुक्यात सर्वात मोठी हतरू पाच प्रभाग व गडगा भांडूम चार प्रभाग असलेल्या ग्रामपंचायतींसह धरमडोह, तेलखार, नागापूर आकी मोरगड गौरखेडा बाजार सोमवारखेडा बोराळा कुलंगणा खुर्द, जामली आर, चिचखेडा अंबापाटी, वस्तापूर, बदनापूर, भुलोरी, खडीमल, आवागड राहू, चुरणी, गांगरखेडा कोरडा, कोयलारी, काटकुंभ व बामादेही या ग्रामपंचायतींचा समावेश आहे, २६ सरपंचपदांसाठी १६० उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत २२६ जागांसाठी ५४५ नामांकन अर्ज वैद्य ठरले होते, त्यापैकी ६३ नामांकन मागे घेण्यात आल्याने ४३१ उमेदवार सदस्यपदांसाठी रिंगणात आहेत. ५१ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. ८१ केंद्रांवर मतदान होणार आहे.
सासू-सुनेला चॅलेंज, चुरणीत काका-पुतणे आमनेसामने
चिखलदरा तालुक्याचे विभाजन होऊन चुरणी तालुक्याची मागणी जुनी आहे, येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सदस्यपदासाठी नरेंद्र टाले काका, तर आशिष टाले पुतण्या आमनेसामने आहेत. काटकुंभ येथे सोम्मा परते (मालवीय) व रिता बेठेकर (मालवीय ) या सासू व सून दोन वेगवेगळ्या वार्डांतून सदस्यपदासाठी उभे आहेत. या दोघींना पिंकी बेठेकर या उमेदवाराने चॅलेंज केले आहे, तर गांगरखेडा येथे शंकर भुसूम विरुद्ध रवी शंकर भुसूम अशी बाप-लेकाची थेट लढत चर्चेत आली आहे. तेथेच गोकुळ आठवले व नीलेश बडवतकर या मामा-भाच्याची लढत होणार आहे.
सासरा सरपंच सून सदस्यपदासाठी
ग्रामपंचायतीचे राजकारण घरातच ठेवण्यासाठी घरातीलच सदस्य सुद्धा वेगवेगळ्या पदावर उमेदवारी घेऊन उभे आहेत. चुर्णी येथे सरपंचपदासाठी राजू भुसून, तर सून कीर्ती भुसून सदस्यपदासाठी उभे आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये असे नात्यातील उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत.
नणंद भावजय एकमेकींविरुद्ध रणांगणात
ननंद भावजय हे नातं घरातही चर्चेचा असतं. अनेकदा वादाची ठिणगी याचं नात्यातून पुढे आल्याचे अनेक किस्से आहेत. निवडणुकीच्या आखाड्यात सुद्धा चुरणी येथे रंजना अलोकार व ज्योती येवले या ननंद-भावजय एकमेकींविरुद्ध उभ्या ठाकल्या आहेत. प्रचाराची वेगळी तऱ्हा आणि त्यानंतर मतदान आपल्याला व्हावे यासाठी सुरू असलेली कसरत चर्चेत आली आहे.
मेळघाटात उपसरपंचपदालाही महत्त्व
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील संपूर्ण सरपंचपद आदिवासी महिला पुरुष यांच्यासाठी राखीव आहेत. त्यामुळे इतर समाजातील सदस्यांसाठी केवळ उपसरपंचपदावर डोळा ठेवूनच निवडणूक लढवावी लागते. त्यासाठी मेळघाटात उपसरपंचपदालाही सरपंचपदाएवढेच महत्त्व आहे.