गणेश वासनिक
अमरावती : दक्षिण आफ्रिकेत नोव्हेंबर २०२१ मध्ये ओमायक्रॉन या विषाणूचा शोध लागला. सार्स कोविड -२ या नवीन प्रकाराने अतिशय जलद गतीने जगात फिरणाऱ्या डेल्टा प्रकाराची जागा घेतली आहे. मात्र, जिनोम सिक्वेन्सिंग हा कोरोनाचा प्रसार थांबवेल, अशी माहिती अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या प्राणीशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक तथा डीएनए तज्ज्ञ डॉ. मुमताज बेग यांनी ‘लोकमत’ला दिली. तसेच ओमायक्रॉन जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये महाराष्ट्राने उत्कृष्ट कामगिरी बजावली असल्याचा दावा त्यांनी केला.
डॉ. बेग या सध्या युनिव्हर्सिटी ऑफ गुल्फ, ओंटारियो, कॅनडा येथे रिसर्च स्कॉलर म्हणून कार्यरत आहेत. डॉ. बेग आणि त्यांच्या भारतीय आणि कॅनेडियन सहकारी संशोधकांनी संपूर्ण भारतातून ग्लोबल इनिशिएटिव ऑन शेअरिंग ऑल इन्फ्यूएन्झा (जीआयएसएआयडी) डेटाबेसमध्ये जमा केलेल्या ओमायक्रॉन जिनोमचे विश्लेषण केले.
जीआयएसएआयडी हे एक व्यासपीठ आहे. जिथे जगातील सर्व देश कोविड-१९ जिनोम जमा करीत आहेत. हा एक सार्वजनिक-खासगी सहयोगी उपक्रम आहे आणि कोणतीही संस्था जीआयएसएआयडीला सादर केलेली माहिती मुक्तपणे वापरू शकते, असे डॉ. बेग म्हणाल्या. या अभ्यासाचे सहलेखक डॉ. अश्विन अतकुलवार, (अमलोकचंद महाविद्यालय, यवतमाळ), आकीफ रेहमान (पेस सायन्स कॉलेज, मुंबई) आणि इमार वाय, (मोहॉक कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, हॅमिल्टन, कॅनडा) हे आहेत. याआधी डॉ. बेग आणि त्यांच्या टीमने २०२० मध्ये विनाशकारी डेल्टा प्रकार सुरू होण्यापूर्वी सार्स काेविड २ वर असाच अभ्यास प्रकाशित केला होता. हा अभ्यास मुक्त प्रवेश पबमेडमध्ये उपलब्ध आहे.