आॅनलाईन लोकमतवरूड : नजीकच्या जरूड येथील वसंतराव नाईक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’च्या बुटीबोरी येथील मुद्रण विभागाला भेट दिली. वृत्तपत्रांची छपाई कशी केली जाते, याची माहिती या चिमुकल्यांनी यावेळी जाणून घेतली.जरूड येथील वसंतराव नाईक हायस्कूलचे दीडशे विद्यार्थी व आठ शिक्षक १८ नोव्हेंबर रोजी बुटीबोरी येथील छपाई सयंत्राच्या भेटीला गेले होते. वृत्तपत्रांचे कामकाज कसे चालते, याची माहितीही यावेळी विद्यार्थ्यांना पीपीटीच्या माध्यमातून देण्यात आली. संपादकीय, जाहिरात विभागाकडून प्राप्त झालेल्या मजकुरानंतर पेजिनेशन विभाग त्यावर कसे संस्कार करतो व पाने छपाईसाठी कशी तयार होतात, यासंबंधी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. छपाईची माहिती विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने मिळावी, यासाठी मशीनवर सुरू असलेल्या कामांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. विद्यार्थी यावेळी ‘लोकमत कालदर्शिका २०१८’ च्या छपाईचे साक्षीदार ठरले. त्यांनी ‘लोकमत’च्या हरितऊर्जा प्रकल्पाची (सौरऊर्जा) पाहणी केली. सौरऊर्जेमुळे पाणी, कोळसा व अन्य माध्यमांची बचत करता येते, ही माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रशांची उत्तरे देण्यात आली. ही भेट अविस्मरणीय ठरली, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. ‘लोकमतच्या मुद्रण विभागाला भेट’ हा उपक्रम मुख्य व्यवस्थापकीय संचालकांच्या विशेष कार्यक्रमात सामील आहे, हे विशेष.