आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्हा परिषदेचे कर्मचारी ग्रामीण भागात वर्षभर काम करतात. त्यामुळे त्यांच्यावर मोठे दडपण येते. त्याकरिता ताण-तणावमुक्त व मानसिक समाधानासाठी खेळ आवश्यक आहेत. तीन दिवस टेंशनमुक्त खेळांचा आनंद घ्या आणि मग जोमाने काम करा, असे आवाहन झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी केले.जिल्हा परिषदद्वारा आयोजित अधिकारी-कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २ फेब्रुवारीपासून श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू झाला. याप्रसंगी गोंडाणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीईओ किरण कुलकर्णी होते. प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सीईओ किरण कुलकर्णी, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, अॅडिशनल सीईओ विनय ठमके, प्राचार्य उल्हास देशमुख, पं.स. सभापती सचिन पाटील, डेप्युटी सीईओ सामान्य प्रशासन कैलास घोडके, संजय इंगळे, माया वानखडे, शिक्षणाधिकारी आर.डी. तुरणकर, कृषी विकास अधिकारी उदय काथोडे, विजय रहाटे, बीडीओ थोरात, बाळासाहेब रायबोले, नरेंद्र धारगे व अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व डॉ. पंजाबराव देशमुख, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर क्रीडा ज्योत मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलीत करण्यात आली. याप्रसंगी धारणी पंचायत समितीच्या चमूने पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करून उपस्थित मान्यवरांसह सर्वांना मंत्रमुग्ध केले तसेच चित्रा वानखडे यांनी राजमाता जिजाऊ, साधना पांडे यांनी रमाबाई, सुचिता श्रीराव यांनी झाशीची राणी, वर्षा व्यवहारे यांनी महाराणी ताराबाई, वैशाली देशमुख यांनी सावित्रिबाई फुले व अर्चना ठाकरे यांनी कल्पना चावला यांची आकर्षक वेशभूषा करून उपस्थितांचे लक्ष वेधले. सर्व खेळांडूना मनिष काळे यांनी शपथ दिली. कार्यक्रमाला जि.प.चे अधिकारी, कर्मचारी सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील सुमारे तीन हजार खेळाडू या क्रीडा महोत्सवात सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डेप्युटी सीईओ पंचायत कैलास घोडके यांनी केले. संचालन दिपाली बाभूळकर व आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी नितीन उंडे यांनी केले.
क्रीडा स्पर्धेतून मिळवा कामाची ऊर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 11:39 PM
जिल्हा परिषदेचे कर्मचारी ग्रामीण भागात वर्षभर काम करतात. त्यामुळे त्यांच्यावर मोठे दडपण येते.
ठळक मुद्देजिल्हा परिषद क्रीडा महोत्सव : अध्यक्ष नितीन गोंडाणे यांचे आवाहन