आमदार प्रताप अडसड यांचे निर्देश, चांदूर रेल्वे येथे आढावा बैठक, पाणीटंचाईवर अधिकाऱ्यांना घेतले धारेवर
चांदूर रेल्वे : घरकुल योजनेच्या यादीतील अनेक लाभार्थींची नावे ‘जैसे थे’ अवस्थेत आहेत. अद्यापही त्यांना न्याय मिळाला नाही. एकही लाभधारकांना वंचित ठेवू नये तसेच ‘ब’ यादी पूर्ण करून ‘ड’ यादीचे काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश आमदार प्रताप अडसड यांनी चांदूर रेल्वे येथे आढावा बैठकीत दिले. यादरम्यान पाणीटंचाईची झालेल्या कामाविषयी त्यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली
चांदूर रेल्वे एसडीओ कार्यालयाच्या सदनात पंचायत समितीची आढावा बैठक घेण्यात आली. यात आरोग्य, पशुसंवर्धन, कृषी, जनसुविधा, अनुसूचित जाती-नवबौद्ध घटकांचा विकास, शिक्षण, पंचायत, लेखा, ग्रामीण पाणीपुरवठा, रोजगार हमी योजना अशा विविध विषयांवर त्यांनी आढावा बैठक घेतली. चांदूर रेल्वे तालुक्यात लसीकरणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. ही टक्केवारी वाढविण्यासाठी आरोग्य विभागाने अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, डेंग्यू तसेच अनेक आजारांनी तोंड वर काढले असताना आरोग्य विभाग करतो तरी काय, असा प्रश्न आ. अडसड यांनी या बैठकीत विचारला.
दरम्यान, पळसखेड, आमला विश्वेश्वर येथील पाणी टंचाईची कामे निकृष्ट दर्जाचे झाली. त्याची त्वरित चौकशी करण्याचे आदेश आमदार प्रताप अडसड यांनी दिले. घरकुल हा विषय बांधकाम विभागाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीचे छोट्याशा कारणावरून घरकुल रद्द करू नये, असे त्यांनी या बैठकीत सांगितले. पंचायत समितीच्या सभापती सरिता देशमुख, उपसभापती प्रतिभा डांगे, पंचायत समिती सदस्य श्रद्धा वऱ्हाडे, भाजप तालुकाध्यक्ष संजय पुनसे, तहसीलदार राजेंद्र इंगळे, गटविकास अधिकारी एस.टी. थोरात तसेच पदाधिकारी व सर्व विभागांचे अधिकारी यांची उपस्थिती होती.
160721\img-20210716-wa0003.jpg
photo