अमरावती : राज्याच्या माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना १ ते २८ जून पर्यंत उन्हाळी सुट्ट्या जाहीर केले आहेत. त्यामुळे २८ जून पासून नवे शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे. परिणामी पुढील दीड दोन महिने शिक्षकासह विद्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षणापासून सुटका झाली आहे. जून महिन्यात कोरोनाची परिस्थिती पाहून शाळा पुन्हा ऑफलाइन सुरू करणार की ऑनलाईन यावर अंतिम निर्णय होणार आहे.
वर्षभरापासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा-महाविद्यालये बंद असले तरी ऑनलाईन अध्यापन, अध्ययन सुरू होते. ऑनलाइन शिक्षणातून अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर शिक्षकांचा भर होता. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे इयत्ता पहिली ते आठवी नववी ते अकरावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अनेक शाळांमध्ये ऑनलाइन वर्ग शिक्षकांकडून घेतले जात होते. विविध शिक्षक संघटनांकडून उन्हाळी शाळांना सुट्टी जाहीर करण्याची मागणी शासनाकडे केली होती. याची दखल घेत शिक्षण संचालकांनी शाळांना सुट्टी देण्याबाबत निर्णय जाहीर केला. नवीन शैक्षणिक वर्षात कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबाबत कळविले जाणार आहेत.
बॉक्स
७६ दिवसांपेक्षा अधिक सुट्या नाही
शाळेत उन्हाळ्याची व दिवाळीची सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव किंवा नाताळ च्या सुट्या देण्यात याव्यात, यासंबंधी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीने निर्णय घेण्यात येणार आहे. या सुट्या जाहीर करताना माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षात ७६ दिवसांपेक्षा जास्त सुट्टी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.