प्रदीप भाकरे
अमरावती: शिक्षणानिमित्त येथे भाड्याने राहणाऱ्या संजना वानखडे हिच्या तिच्याच क्लासमेटने केलेल्या खुनाची शाई अद्याप वाळली नसताना गाडगेनगर परिसरात भाड्याने राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थीनीचा अश्लाघ्य प्रकारे पाठलाग करण्यात आला. ती विद्यार्थिनी पाठलाग करून गर्भित धमकी देणाऱ्या त्या आरोपीला ओळखत नसल्याने पोलिसांसमोर आरोेपी शोधण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. तुझ्या मैत्रिणीला बाहेर काढ, आपण दोघे रूममध्ये राहू! ही त्याने दिलेली गर्भित धमकी अमरावतीत भाडयाने राहणाऱ्या मुलींच्या संरक्षणाचे वाभाडे काढणारी आहे.
१३ मे रोजी रात्री १.१५ च्या सुमारास गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी हा प्रकार घडला. याप्रकरणी संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी पहाटे चारच्या सुमारास एका अनोळखी इसमाविरूध्द विनयभंग, धमकी व पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला. गाडगेनगर पोलिसांनी पिडित मुलीला त्या आरोपीचा ज्या मोबाईल क्रमांकावरून मिस कॉल आला होता, त्या क्रमांकाची शहानिशा चालविली आहे. त्याबाबत सायबर पोलिसांची मदत देखील घेतली जाणार आहे.नेमके घडले काय?
१३ मे रोजी रात्री १.१५ च्या सुमारास एक अल्पवयीन मुुलगी रोडवरून तिच्या खोलीकडे जात होती. त्यावेळी ४० ते ४५ वर्षे वयोगटातील एक अनोळखी इसम तेथे दुचाकीसह उभा होता. त्याने तिला आवाज दिला. एवढया रात्री का फिरत आहे, अशी विचारणा त्याने केली. त्यावर, काका मला मेडिकल संदर्भात काम होते, त्यामुळे मी बाहेर गेली होती, असे ती उत्तरली.जबरीने घेतला मोबाईल क्रमांक
त्या अनोळखी इसमाने तू तुझ्या मित्रासोबत रात्रीला फिरते, तुझा पोलिसांत रिपोर्ट करतो, अशी धमकी दिली. आरोपी इतक्यावरच थांबला नाही, तर फिजिकल रिलेशन ठेऊ दे, मी तुला पैसे देईन, तुझ्या मैत्रिणीला रूमबाहेर काढ, आपण दोघे रूममध्ये राहू, असे म्हणून त्या अनोळखी इसमाने तिचा मोबाईल नंबर घेतला. त्याने तिच्या मोबाईलवर मिसकॉल देखील दिला. त्याने त्याचवेळी तिचा विनयभंग केला. त्या प्रकाराने पुरत्या घाबरलेल्या त्या मुलीने त्याच्या हाताला झटका देत ती रूमकडे धावली. त्यामुळे अनर्थ टळला. त्यातून थोडे सावरत तिने थोड्यावेळाने पोलीस ठाणे गाठले.