अमरावती: जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे एक्स-रे मशीनसाठी लागणाऱ्या फिल्म संपल्याने मागील चार ते पाच दिवसांपासून रुग्णांना एक्स-रे अहवाल घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी बोलविण्यात येत आहे. त्यामुळे एक्सरे अहवाल पाहिल्याशिवाय पुढील उपचार तरी कसे होतील, असा प्रश्न संतप्त रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाइकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. तर रुग्णालयातील वाढलेल्या रुग्णांच्या संख्येमुळे एक्स-रे फिल्मचा तुटवडा असून फिल्म उपलब्ध होताच रुग्णांना अहवाल देण्यात येत असल्याची माहिती रुग्णालयातून मिळाली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सर्वच प्रकारची उपचार सुविधा नि:शुल्क झाल्यापासून उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अनेक रुग्ण गरज नसतानाही एक्स-रे काढत असल्याचे दिसून येत आहे. इर्विनमधील एक्सरे विभागात रोज सरासरी १५० ते २००च्या जवळपास रुग्ण हे एक्स-रे काढण्यासाठी येतात. अपघातग्रस्त रुग्णांचे निदान करण्यासाठी तातडीने एक्स-रे काढणे हे गरजेचे असते. तसेच आठवड्यातील दर बुधवारी दिव्यांग बांधवांची तपासणी होते. त्यामुळे या दिवशी एक्स-रेसाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे जास्त मोठ्या प्रमाणावर असते. आणि एक्स-रेच्या अहवालानंतरच संबंधित रुग्णांवर आवश्यक ते उपचार केले जातात. परंतु रुग्णालयातील ज्या फिल्मवर अहवाल छापला जातो त्या फिल्मचा साठाच संपल्याने रुग्णांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे एक्स-रे विभागातून रुग्णांना आज एक्स-रे करा अहवालासाठी दोन दिवसांनी या असे सांगण्यात येत आहे. मागील चार दिवसांपासून फिल्म नसल्याने शेकडो रुग्णांचे अहवाल अप्राप्त आहेत. रुग्णालय प्रशासनाने काही प्रमाणात फिल्म खरेदी केल्या असून ज्या रुग्णांचे अहवाल पेंडिंग आहेत त्यांना आधी त्यांचा अहवाल देण्यात येत असून नवीन रुग्णांना दुसऱ्या दिवशी बोलविण्यात येत आहे.
मागील तीन दिवसांपूर्वी अपघातामध्ये जखमी झालेल्या नातेवाइकांना इर्विनमध्ये भरती करण्यात आले होते. ज्या दिवशी भरती केले त्याच दिवशी तिघांचेही एक्स-रे करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार एक्स-रे देखील काढले. परंतु या एक्सरेच्या अहवालासाठी दोन दिवस वाट पाहावी लागली. अहवालाअभावी रुग्णांवर पुढील उपचार झाले नाहीत.- सुंदर शामसुंदर, रुग्णांचा नातेवाईक