चांदूर बाजार - पंचांगशास्त्रानुसार ग्रह-ताऱ्यांवर आधारित एकूण १२ नक्षत्रांतर्गत पावसाचा अंदाज वर्तविण्यात येतो. यातील तिसरे नक्षत्र म्हणजे आर्द्राला २२ जूनच्या पहाटे ५ वाजून ३७ मिनिटांनी सुरुवात झाली आहे.
नक्षत्राचे वाहन कोल्हा असल्यामुळे,या नक्षत्रात पाऊसही कोल्ह्या प्रमाणेच लबाड असण्याचा अंदाज दिसून येतो. काही भागात ढग असूनही वाऱ्याचे प्रमाण जास्त असल्याने पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सूर्याच्या नक्षत्रकालीन प्रवेश वेळेतील ग्रहस्थितीनुसार या नक्षत्रातही पाऊस साधारण असण्याची शक्यता आहे. तथापि, बहुतांश भागात या नक्षत्राचा पाऊस, दिलासा देणारा राहील. पौर्णिमेच्या आसपास अर्थात २५ जूनच्या सुमारास वारा-वादळासह पावसाचे योग आहेत. विशेषत: या नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात २७ जूननंतर सार्वत्रिक पावसाचे योग आहेत. परंतु, हवामान वादळीच असेल. तथापि, प्रत्यक्ष वातावरणातील बदल व स्थानिक हवामान यामुळे पावसावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा शास्त्रीय अंदाज, आजवरचा अनुभव व त्या-त्या ठिकाणी पडलेल्या पावसाच्या अंदाजानुसार पेरणीचा व इतर कामांचा निर्णय घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले.
यावर्षी मान्सून एक महिना उशिराने?
सहदेव भाडळी यांच्या पुस्तकातील अंदाजानुसार, यावर्षी मान्सूनचा पाऊस, एक महिना उशिरा येणार आहे. आषाढ महिन्यात पांच शनिवार, श्रावणात पाच रविवार, भाद्रपदात पाच
मंगळवार तसेच आषाढ एकादशी मंगळवारी आल्यास दुष्काळ पडतो. यावर्षी या पैकी फक्त आषाढी एकादशी मंगळवारी आली आहे. त्यामुळे यावर्षी दुष्काळ पडणार नाही. पण, नियमित पावसाळा एक महिना उशिरा सुरू होण्याचा अंदाज आहे. अर्थात मान्सूनचा पाऊस जुलैमध्ये सुरू होईल. त्यानंतर पूर्ण श्रावण महिना पावसाचा असेल. पुनर्वसू नक्षत्राचे शेवटचे आठ दिवस, संपूर्ण पुष्य नक्षत्र तसेच आश्लेषा नक्षत्राच्या पहिले दोन चरणात चांगला पाऊस पडेल. १३ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान जोरदार पाऊस होईल, असा अंदाज ज्योतिषशास्त्र अभ्यासकांनी वर्तविला आहे.