वरूड : आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह अनेक वर्षांपासून वरूड येथे भाड्याने जागा घेऊन चालविले जात आहे. मात्र, आदिवासी विकास विभागाने सदर वसतिगृह येथून पाच किमी अंतरावर असलेल्या धनोडी येथे वनविभागाच्या जागेत बांधण्याचे नियोजन केले आहे. सदर वसतिगृह हे वरूड नगरपालिका हद्दीतच करावे, अशी मागणी आदिवासी संघटनांसह भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
शहरापासून ५ किमी अंतरावर असलेल्या धनोडी येथे वनविभागाच्या जागेत हे वसतिगृह बांधकाम करण्याचा घाट प्रकल्प अधिकाऱ्यांनी घातला आहे. गतवर्षी हा प्रस्ताव येताच आदिवासी संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला. वरूड नगर परिषद हद्दीतच सदर वसतिगृहाचे बांधकाम करावे, अशी आग्रही मागणी होती. आदिवासी मुला-मुलींना पाच किमी अंतराहून शाळा-महाविद्यालयांत येणे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नाही, असे या संघटनेचे म्हणणे होते. मात्र, आता प्रकल्प अधिकारी धारणी यांनी धनोडी येथे मलकापूर रस्त्यावर आदिवासी वसतिगृह प्रस्तावित केल्याने आदिवासी बांधवांमध्ये खळबळ उडाली आहे. धनोडी येथे वसतिगृह झाल्यास आदिवासी मुलांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागेल, परिणामी, वसतिगृह वरूड येथेच बांधण्याची मागणी तहसीलदारांमार्फत संबंधितांकडे करण्यात आली आहे.
------------------------