मारोती पाटणकर लोकमत न्यूज नेटवर्कचुरणी : गावातील आठवडी बाजारात आदिवासी व थाट्यांची लगबग चांगलीच रंगतदार ठरली आहे. बुधवारी सर्वात मोठा आठवडी बाजार अर्थात चुरणीत भरला. दिवाळी होताच मेळघाटातील आदीवासी बांधवांना वेध लागतात ते घुंगरू बाजाराचे. दिवाळीनंतर कार्तिकी पौर्णिमेपर्यंत भरणार्या आठवडी बाजाराला घुंगरू बाजार म्हटले जाते. दीपावलीनंतर येणारा जो आठवडा असतो, तो थाट्या व आदिवासी बांधवांकरिता घुंगरू बाजार म्हणून प्रसिद्ध असतो. मेळघाटातील आदिवासी बांधवांची संस्कृती, परंपरा विविधरंगी असल्या तरी प्रत्यक्ष मनोरंजनाच्या साधनांचा त्यांच्याकडे अभाव आहे. त्यामुळे कलागुणाच्या आधारावर ही मंडळी आपले मनोरंजन करून घेतात. चुरणी बाजारामध्ये लगतच्या ४५ आदिवासी गावांतील नागरिक सहभागी होत असतात. यानिमित्त आदिवासी बांधव व थाट्या यांनी ढोलकीच्या तालावर मनसोक्त नाचून फगवा वसूल केला, फगव्याचा स्वरुपात मिळालेल्या पैशांचा उपयोग सामूहिक भोजन व धार्मिक कार्याकरिता करण्याचे नियोजन होत आहे. वर्षानुवर्षे थाट्या व आदिवासी बाधवांनी ही परंपरा जोपासली आहे. चुरणी आठवडी बाजारात दूरदुरून आदिवासी बांधवांचे जत्थे उतरले होते. या बाजारामध्ये परिसरातील पाड्यांतील आदिवासी बांधव एकत्र आले. ख्यालीखुशाली विचारत त्यांनी एकमेकांच्या भेटीगाठी घेतल्या. बाजारातील थाट्या व आदिवासी बांधवांच्या नृत्य व गायनाने संपूर्ण बाजारातील जनतेचे लक्ष वेधून घेतले होते. थाट्या व आदिवासी बांधवांच्या घुंगरू बाजाराची चर्चा नागरिकांच्या कानावर असल्यामुळे चुरणी आठवडी बाजारात गर्दी दिसून आली.