अमरावती : ती दररोज वेळेवर कॉलेजसाठी निघायची. अन् वेळेवर घरी देखील परतायची. त्यामुळे आपली ज्युनिअर कॉलेजिअन मुलगी मन लावून अभ्यास करत असल्याची पालकांची भावना प्रबळ झाली. पण हाय रे, एक दिवस कॉलेजमधून फोन गेला. पालक प्राध्यापकाला सामोरे गेले. तुमची मुलगी दोन महिन्यांपासून कॉलेजला येत नसल्याचे ऐकून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यानंतर एका तरूणाने तिला दोन महिने कॉलेजमध्ये जाण्यास रोखले. तो तिला कॉलेजबाहेर व लगतच्या चहाटपरीवर फिरवत राहिल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले.
विश्वासात घेऊन विचारणा केली असता, अल्पवयीन मुलीचा पाठलाग, धमकी व विनयभंगाचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी, बडनेरा पोलिसांनी २५ मार्च रोजी सायंकाळी आरोपी राज अशोक खंडारे (१९, रा. विलासनगर, गल्ली क्रमांक ३) याच्याविरोधात विनयभंग व पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, त्या अल्पवयीन मुलीची राजशी सोशल मीडियातून ओळखी झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध बहरले. पुढे त्याने तिची अडवणूक सुरू केली. तू कॉलेजला जाऊ नकोस, मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे, असे म्हणून तो तिला जबरदस्तीने कॉलेजला जाऊ न देता विलास नगर व कॉलेजच्या परिसरात रोज फिरवत होता. कॉलेज परिसरात तो नेहमीच तिला भेटत राहिला.
२५ मार्च रोजी पालक कॉलेजमध्ये
तिच्या वडिलांना १८ मार्च रोजी तुम्ही कॉलेजमध्ये या, असा फोन कॉल करण्यात आला. त्यामुळे तिचे वडिल मुलीसह २५ मार्च रोजी संबंधित कॉलेजला गेले. तेथ तुमची मुलगी दोन महिन्यांपासून कॉलेजला येत नसल्याचे तिच्या वडिलांना सांगितले. त्यावर त्यांनी त्या प्राध्यापकासमक्षच मुलीला सर, काय म्हणत आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी त्या मुलीने राज खंडारेचा कारनामा सांगितला.
मारण्याची धमकी
कॉलेजला जाऊ न देता तो दररोज आपल्याला रोडवरील टपरीवर चहा नाश्ताकरिता घेऊन जायचा. त्याने मोबाईल सुध्दा घेवुन दिला होता. त्याने लग्नाची देखील बतावणी केल्याचे मुलीचे म्हणणे आहे. भेटण्यास येऊ नकोस, मला तुझ्याशी कुठलेही संबंध ठेवायचे नाहीत. असे बजावले असता त्याने आपल्याला जिवाने मारुन टाकेन किंवा स्वत:च्या जिवाचे कमी जास्त करेल अशी धमकी दिल्याचे मुलीने बडनेरा पोलिसांत नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले आहे.