चांदूररेल्वे (अमरावती) : ‘व्हॅलेंटाईन डे’च्या आदल्या दिवशी महाविद्यालयीन तरुणींना प्रेमविवाह न करण्याची शपथ दिल्याने चर्चेत आलेल्या येथील महिला महाविद्यालयातील एका तरूणीने प्रियकरासोबत पळ काढला. यवतमाळ जिल्ह्यातील एका धार्मिक संस्थानमध्ये जाऊन तिने प्रेमविवाह केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.येथील महिला महाविद्यालयातील राज्यशास्त्राचे विभागप्रमुख प्रदीप दंदे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरादरम्यान ‘टिनएजर’ मुलींना प्रेमविवाह न करण्याची शपथ दिली होती.त्यावर साधक-बाधक प्रतिक्रियांचा पाऊस पडला. राजकीय नेत्यांनीही ती शपथ मुलींनाच का, असा सवाल उपस्थित केला.संस्थेने प्राचार्यांसह तिघांना निलंबित केले. त्या तिघांचे निलंबन मागे घेण्यात यावे, यासाठी विद्यार्थीनींनी तासिका बंदचे आंदोलनही केले.दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे यांनी शिक्षकांचे निलंबन मागे घेण्याबाबतचा मुद्दा विधिमंडळातही उपस्थित केला. आता प्रकरणाला आलेल्या नव्या वळणामुळे पुन्हा त्याकडे लक्ष वेधले गेले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत संबंधित मुलीच्या पित्याने चांदूररेल्वे पोलिसांत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. २९ फेब्रुवारी रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ती महाविद्यालयात गेली, मात्र परतली नाही.बरीच शोधाशोध करण्यात आली. ती घरी न पोहोचल्याने १ मार्च रोजी त्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. यवतमाळ जिल्हयातील बाभुळगाव येथील एका संस्थानात प्रियकरासोबत प्रेमविवाह केला, असा संदेश त्या मुलीकडून चांदूररेल्वे पोलिसांना प्राप्त झाल्याची विश्वसनीय माहिती आहे.>२९ फेब्रुवारी रोजी संबधित मुलगी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात प्राप्त झाली. चौकशी करण्यात येत आहे.- दीपक वानखडे,ठाणेदार, चांदूर रेल्वे
प्रेमविवाह न करण्याची शपथ घेणाऱ्या महाविद्यालयातील तरुणी गेली पळून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 5:15 AM