परंपरेला फाटा : सागर चित्रकार यांचे हृदयविकाराने निधनलोकमत न्यूज नेटवर्कपथ्रोट : पित्याच्या आकस्मिक निधनामुळे कुठाराघात झालेला. मात्र, त्या स्थितीतदेखील खंबीर राहून एकुलत्या एका मुलीने संत गजानन महाराजांचा जयघोष करीत पित्याच्या पार्थिवाला भडाग्नी दिला आणि उपस्थित जनसमुदाय हेलावून गेला. सागर पाटील चित्रकार असे मृताचे नाव आहे. ही घटना गुरूवारी घडली. अंजनगाव सुर्जीहून सागर चित्रकार यांची बदली नुकतीच धामणगाव येथे झाली होती. तेथील बँकेत निरीक्षक म्हणून ते रुजू झाले होते. कर्तव्यावर असतानाच अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. ते स्वत:च चारचाकी वाहन चालवित परतवाडा येथे उपचार घेण्याकरिता आले. मात्र, येथील रूग्णालयात येताच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. ते अवघे ४२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, बहीण, भाऊ व मुलगी असा आप्त परिवार आहे. त्यांच्या मृत्युची वार्ता कळताच त्यांच्या कुटुंबावर कुठाराघात झाला. शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर पथ्रोट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्व पारंपरिक रितीरिवाजांना फाटा देऊन त्यांच्या क्षमा नावाच्या एकुलत्या एका मुलीने त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. मागील वर्षीच क्षमाने इयत्ता दहावीची परीक्षा ९८.३६ टक्के गुणांसह उत्तीर्ण केली आहे. सागर पाटील चित्रकार यांनी लाडक्या क्षमाच्या प्रगतीची अनेक स्वप्ने पाहिली होती. मात्र, डाव अर्ध्यावर सोडून ते निघून गेले. अखेर त्यांच्या लाडक्या क्षमानेच त्यांना शेवटचा निरोप दिला आणि उपस्थितांच्या डोळ्यांना आसवांच्या धारा लागल्या.
मुलीने दिला पित्याला भडाग्नी
By admin | Published: May 27, 2017 12:12 AM