अमरावती : प्रियकरासाठी प्रेयसीने मामाच्या घरातून लाखो रुपयांचे सोने चोरल्याची बाब काही महिन्यांपूर्वी उघड झाली होती. त्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच एका भाडेकरू तरुणीने नातेवाईक महिलेचे ७ लाख रुपये किमतीचे दागिने चोरून ते तिच्या प्रियकराला दिल्याची धक्कादायक घटना नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली. २९ सप्टेंबर रोजी हा प्रकार उघड झाला. काही दिवसांनी तिनेदेखील पळ काढला.
याप्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी ७ नोव्हेंबर रोजी रात्री त्या तरुणीविरूद्ध गुन्हा दाखल केला. यातील फिर्यादी महिला ही नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या तिच्या नातेवाइकाच्या फ्लॅटमध्ये राहते. त्या महिलेसोबत नातेवाईक असलेल्या दोन मुलीदेखील तेथेच शिक्षणानिमित्त राहतात. दरम्यान, त्या महिलेने स्वत:कडील २० ग्रॅमचा चपलाहार, ४५ ग्रॅमचा दोन पदरी चपला हार, ३५ ग्रॅमचे पट्टीचे मंगळसूत्र, १५ ग्रॅमची अष्टकोनी मोहनमाळ, १५ ग्रॅमचे मिनी मंगळसूत्र असे सुमारे १४० ग्रॅम सोन्याचे दागिने हे लाकडी कपाटात लॉक करून ठेवले होते. २९ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास अंगठी ठेवण्याकरिता महिलेने कपाट उघडले असता तिला धक्काच बसला. तब्बल ७ लाख रुपये किमतीचे दागिने कपाटात आढळून न आल्याने त्या हवालदिल झाल्या. पोलिस ठाण्यात पोहोचल्या. दरम्यान तू घरी चल, तुला सर्व सांगते, असे म्हणून आरोपी नातेवाईक मुलीने महिलेला पोलिस ठाण्यातून परत आणले.
अशी घडली घटना
घरी परतल्यानंतर आरोपी मुलीने आपण ते दागिने आपल्या प्रियकराला नेऊन दिल्याचा गाैप्यस्फोट केला. माझे त्या मुलावर प्रेम असल्याने त्याला ते दागिने दिल्याचा पुनरूच्चार तिने केला. त्यामुळे फिर्यादी महिलेने ४ ऑक्टोबर रोजी त्या मुलाला बोलावून घेतले. आपल्याला आरोपी मुलीनेच ते दागिने दिल्याची कबुली देत ते आपण १५/२० दिवसांत परत आणून देऊ, अशी ग्वाही त्याने दिली. त्यामुळे महिलेने विश्वास ठेवून तक्रार देणे टाळले. मात्र काही दिवसांनी ती तरुणी देखील घरातून पसार झाली. ते लक्षात येताच महिलेने पोलिस ठाणे गाठले.