अमरावती : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ देण्याची मागणी माजी पालकमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे यांनी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
कृषी विभागाच्या या योजनेत विमा कंपनीच्या जाचक निकषांमुळे अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. समन्वयासाठी जिल्हा समिती गठित करण्यात आली आहे. तरीसुद्धा विमा कंपनी चुकीचे निकष लावून अर्ज नामंजूर करीत आहे. त्यामुळे या जिल्हा समितीला विशेष अधिकार द्यावे. जेणेकरून या योजनेतील नामंजूर प्रकरणांना न्याय मिळेल व अशा प्रकाराला आळा बसेल, असे पोटे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या कालावधीत ज्या शेतकऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्या कुटुंबातील कर्ता गमावल्यामुळे त्या परिवाराला आर्थिक बळ मिळण्याद्या दृष्टिकोनातून या योजनेचा लाभ देण्याची मागणी आमदार पोटे यांनी केली आहे.