चांदूर रेल्वे : शहरातील डांगरीपुरा वाॅर्डात ओबीसींची संख्या जास्त असूनदेखील १५ ते २० वर्षांपासून अनुसूचित जातीला या वाॅर्डचे आरक्षण गेले आहे. चुकीची वाॅर्ड रचना दुरुस्त करून ओबीसी, एस.टी., एन.टी. प्रवर्गाला न्याय द्यावा, अशी मागणी हॉकर्स फेडरेशनतर्फे मुख्याधिकारी मेघना वासनकर यांना निवेदनातून करण्यात आली. चांदूर रेल्वे शहरातील वाॅर्ड क्रमांक १५ डांगरीपुरा तसेच वाॅर्ड क्रमांक १६ मिलिंदनगर हे दोन्ही वाॅर्ड पूर्वीपासून वेगवेगळे आहेत. तसेच वेगवेगळ्या प्रभागांमध्ये या दोन्ही वाॅर्डांचा समावेश होतो. वाॅर्डचे रुपांतर प्रभागांमध्ये करण्यात आले. या प्रभागाची पुनर्रचना करताना या दोन्ही वाॅर्डात राहणाऱ्या नागरिकांची जात, धर्म, संस्कृती, परंपरा यांचा विचार करावयास पाहिजे होता. तो केला गेला नाही. या प्रभागाची नव्याने स्थापना करून या प्रभागाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी कायम करण्यात आले. त्यामुळे या वाॅर्डात व प्रभागात समाविष्ट असणाऱ्या ओबीसी, एसटी व एनटी या वर्गवारीतील नागरिक कायम वंचित राहत आहेत. एस.सी. प्रवर्गासाठी राखीव असतानाही दलितवस्ती विकासासाठी निधी प्राप्त होत नाही. वाॅर्ड क्रमांक १५ हा शंभर टक्के ओबीसींचा, तर वाॅर्ड क्रमांक १६ मिलिंदनगरमध्येसुद्धा काही प्रमाणात ओबीसी वर्गवारी जास्त आहे. तरीदेखील या दोन्ही वाॅर्डांना एकत्र करून एका प्रभागाची स्थापना करून तो कायम अनुसूचित जातीसाठी आरक्षित केला जातो. आता नव्याने पुनर्रचना करून जे लोक संविधानिक अधिकारापासून वंचित राहिले. त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी हॉकर्स फेडरेशनचे अध्यक्ष प्रदीप मेश्राम तसेच डांगरीपुरा येथील नागरिक गजानन कुंभरे, प्रभाकर वरटकार, राजेंद्र कावरे, राहुल देशमुख, प्रकाश मेश्राम, मनोहर मेश्राम, सुरज हटवार, गजानन पवार, वासुदेव हटवार, नामदेव सहारे, सुमित शेंडे, सचिन देशमुख, गोपाल मोरे, सुखदेव करपाते, जागोराव हटवार, बाबाराव वरटकार, सुरेश मेश्राम, शुभम सहारे, राजिक शहा, रोशन शहा यांच्यासह अनेक अनेकांनी केली. निवेदन देताना आम आदमी पार्टीचे पश्चिम विदर्भ संघटनमंत्री नितीन गवळीसुद्धा उपस्थित होते.
वाॅर्ड रचनेत डांगरीपुरा ओबीसींना द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:16 AM