- गणेश वासनिक अमरावती - देश, राज्यात महिला-मुलींवर अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहे. अशा घटना रोखण्यासाठी शासन त्या-त्या स्तरावर प्रयत्नरत आहे. मात्र मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली असून, सरकारने महिलांना रिव्हाल्वर हाताळण्याची परवानगी द्यावी, अमरावतीत परवानगी दिल्यास मी रिव्हाल्वर घेऊन देतो, असे वादग्रस्त वक्तव्य मूर्तिजापूरचे माजी नगराध्यक्ष तथा शिंदे सेनेचे पदाधिकारी नानकराम नेभनानी यांनी रविवारी येथे केले.
बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या अत्याचारविरोधात अमरावती येथे नेहरू मैदान ते ईर्विन चौक या दरम्यान सकल हिंदू समाजाच्यावतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना नानकराम नेभनानी यांनी वादग्रस्त वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली. नेभनानी एवढ्यावरच थांबले नाहीत तर अत्याचार रोखताना मुली-महिलांच्या हातून दोन-तीन लोकं मेले तरी चालेल पण चुकीचा माणूस वाचू नये, त्याचं मी समर्थन करेल. त्यामध्ये लागणाऱ्या कोर्ट कचेरीचा संपूर्ण खर्च मी करेल, असेही ते म्हणाले. ‘त्या’ मुली-महिलांच्या कुटुंबीयावर काही आले तर त्यासाठी मी समोर राहील, असा विश्वास देखील नेभनानी यांनी दिला. नेभनानी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळीक आहेत. ते शिंदे सेनेचे मुख्य समन्वयक तथा शिवसेना प्रणित सिंधी समाज राज्य संघटक आहेत. तसेच जिल्हा नियोजन समितीत विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त आहेत.