जिल्हाधिकारी बांगर : पदभार स्वीकारलाअमरावती : मेळघाटातील कुषोषणाच्या उच्चाटनाला प्राधान्य देणार असून जिल्ह्यातील इतरही महत्त्वाचे प्रश्न निकाली काढणार असल्याचे प्रतिपादन अमरावतीचे नवे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केले. जिल्हाधिकारी बांगर यांनी गुरूवारी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. मूळ बार्शी येथील रहिवासी अभिजित बांगर हे मागील तीन वर्षांपासून पालघरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. मावळते जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली आहे. प्रभारी जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी के.आर. परदेशी यांच्याकडून त्यांनी २६ एप्रिल रोजी पदभार स्वीकारला. यावेळी पुढे बोलताना बांगर म्हणाले, पालघर हा नवीन जिल्हा झाल्यानंतर पहिले जिल्हाधिकारी म्हणून आपली नियुक्ती या ठिकाणी झाली. त्यामुळे येथे काम करताना सर्वच नवीन होते. प्रशासकीय इमारतींसह, पदनिर्मित विविध कामे करण्याची जबाबदारी होती. ती अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण करता आली. यासोबत पालघर जिल्ह्यात जव्हार, मोखड, विक्रमगड हे तालुके कुपोषणामुळे चर्चेत होती. याठिकाणी कुपोषणाच्या समस्येचे उच्चाटन करण्यासाठी जिल्हाधिकारी म्हणून केलेल्या प्रयत्नांमुळे बराच बदल झाला आहे. आता जिल्ह्यातील आदिवासीबहूल दोन्ही तालुक्यांत कुपोषणाच्या उच्चाटनासाठी प्रभावीपणे कारवाई करण्यास प्राधान्य देणार असल्याचे ते म्हणाले. तत्कालीन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी ज्या काही नावीण्यपूर्ण योजना व प्रकल्प राबविले त्यात लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांचे अपरजिल्हाधिकारी के.आर.परदेशी, आरडीसी राम सिद्धभट्टी, उपजिल्हाधिकारी इब्राहिम चौधरी यांच्यासह तहसीलदार, नायब तहसीलदार, महसूल कर्मचारी संघटना, श्रमिक पत्रकार संघटनेने स्वागत केले.
कुपोषणमुक्तीला प्राधान्य देणार
By admin | Published: April 27, 2017 12:10 AM