प्रदीप भाकरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहर व जिल्ह्यात अलीकडे दुचाकीचोरीचे सत्र अव्याहतपणे सुरू आहे. आठवड्यातून मोबाईल चोरीच्या घटनादेखील नोंदविल्या जात आहेत. दिवाळीच्या निमित्ताने आता चोरांसाठी सुकाळ आला आहे. अमरावती शहरातील कुठल्याही चौकात, व्यापारी संकुलात वा उड्डाणपुलाखाली दुचाकी सुरक्षित नाही. अगदी दवाखान्याच्या, शासकीय कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला जात असल्याने वाहनधारकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरातील विविध बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. गर्दी असल्यामुळे अनेक जण आपली दुचाकी उड्डाणपुलाखाली ठेवून बिनधास्त शॉपिंग करण्यासाठी जात असल्याचे सारासार चित्र आहे. मात्र, दुचाकी गमवायची नसेल, तर अधिक सजग राहण्याची गरज आहे. शॉपिंग, बाजारहाट होईपर्यंत दुचाकीजवळ कुणीतरी ठेवा किंवा ठेवलेली दुचाकी नजरेच्या टप्प्यात राहावी, ते पाहण्याची गरज आहे.
दुचाकीचे सुटे पार्ट काढून विक्रीपकडले जाऊ नये म्हणून दुचाकीचोरांच्या टोळ्या नंबरप्लेट बदलून, बनावट नंबर टाकून चोरीच्या वाहनांची विक्री करतात. त्यातही पकडले जाण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अनेक जण दुचाकीचे सुटे भाग काढून त्यांची विक्री करीत असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. शहराच्या पश्चिम भागात अवघ्या १० मिनिटांत संपूर्ण दुचाकीचे पार्ट न पार्ट वेगळे केले जात असल्याची माहितीदेखील आहे.
ही घ्या काळजीमोबाईल : शक्यतो मोबाईल खालच्या खिशात ठेवा. तो वरच्या खिशात ठेवू नका. मोबाईलवर बोलत बाजारहाट वा अन्य खरेदी करू नका. संशयास्पद व्यक्तीपासून दूरच राहा.दुचाकी : ज्या व्यावसायिक संकुलाकडे हक्काचे पार्किंग स्थळ आहे, तेथेच शक्यतोवर दुचाकी पार्क करा. हॅण्डल लॉक आठवणीने करा. शक्यतो सोबत असलेली व्यक्ती दुचाकीजवळ थांबवून चोरांना संधी देऊ नका. तातडीने पोलिसांशी संपर्क साधा. चोरी गेलेला मोबाईल सापडतो, पण वेळाने. चोरी गेलेले मोबाईल पुन्हा मिळाल्याची टक्केवारी ३० ते ४० च्या घरात आहे. त्यामुळे चोरी गेलेला मोबाईल मिळेलच, याबाबत कुणीही शाश्वती देऊ शकत नाही. यंदा शहर पोलीस आयुक्तालयाने ४७ लाख रुपयांचे ४५१ मोबाईल मूळ मालकास परत केले. मोबाईल सापडतो, पण वेळाने हे वर्तमानातले अस्वस्थ वास्तव आहे.