अमरावती : वरूडच्या नंदनवन कॉलनी येथील रहिवासी तथा लेबर कंत्राटदार संजय टाकरखेडे यांच्या घरातून लाखांचे सोन्याचे दागिणे लंपास करण्यात आल्याची पहिली खबर मिळताच वरूड पोलीस ठाण्यात मोठी खळबळ उडाली. चोरीचे गांभिर्य लक्षात घेऊन प्रभारी ठाणेदारांना त्वरेने माहिती देण्यात आली. अमरावतीहून श्वानपथकासह ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी चार ते पाच तास पंचनामा केला. तथा ४ लाख ३४ हजारांचे सोन्याचे दागिणे लंपास करण्यात आल्याची तक्रार नोंदवून घेण्यात आली. पण कशात काय? जे दागिणे चोरीला गेले, अशी फिर्याद नोंदविली गेली. ते दागिणे दुसऱ्याच दिवशी घरातच इतरत्र दिसून आले.
वरूड पोलिसांनी सोमवारी रात्री ११.३८ च्या सुमारास नोंदविलेल्या एफआयआरनुसार, टाकरखेडे यांच्या घरातून ४ लाख ३४ हजारांचे सोन्याचे १८५ ग्रॅम दागिणे लंपास करण्यात आले. १७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते ७.४५ या अवघ्या पाऊण तासात ही जबरी चोरी झाली. ते नातेवाईकांकडे गेले असता अज्ञातांनी त्यांच्या घरातील कपाटातून सोन्याचा नेकलेस, पोत, राणीहार, सोन्याचे तीन गोफ, कानातील जोड, मुखडा, मिनी मंगळसूत्र, लॉकेट तथा २५ हजार रुपये रोख असा ऐवज लांबविला. रात्री आठच्या सुमारास ते घरी परतले असता, तुटलेल्या कुलूपकोंडा पाहत त्यांना चोरीची चाहूल लागली. आत जाऊन पाहिले लाकडी कपाट अस्तव्यस्त दिसले. लागलीच या प्रकाराची माहिती वरूड पोलिसांनी देण्यात आली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन वरूड पोलिसांनी श्वानपथकासह ठसेतज्ञांना पाचारण केले. तथा पंचनामा केला. ठाणेदारांसह उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळ गाठले.
वरच्या ड्रॉवरमध्ये दिसले दागिणे
घरातील कपाट अस्तव्यस्त दिसल्याने, दागिणे त्याच कपाटात होते, असे वाटल्याने टाकरखेडे यांनी चोरीची तक्रार नोंदविली. दरम्यान सोमवारी रात्री पंचनामा आटोपल्यानंतर विस्कटलेले साहित्य आता तुम्ही लावू शकता, अशी सुचना वरूड पोलिसांनी केली. त्यानुसार मंगळवारी दुपारच्या वेळी साहित्य निट लावत असताना दुसऱ्या कपाटातील ड्रॉवरमध्ये दागिणे व रोख आढळून आली. दुसरीकडे प्रकरणाचे गांथिर्य लक्षात घेऊन एलसीबीचे निरिक्षक देखील तेथे पोहोचणार होते. मात्र तत्पुर्वी दागिणे घरातच आढळल्याची माहिती टाकरखेडे यांच्याकडून वरूड पोलिसांना देण्यात आली. त्या वार्तेने सर्वांचाच जीव भांड्यात पडला. पोलिसांचे काम जरी असले तरी त्यांची धावपळ वृथा गेल्याची प्रतिक्रिया उमटली.
टाकरखेडे यांच्या घरी चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला. जे कपाट अस्तव्यस्त दिसून आले, त्यातच दागिणे असल्याची खात्री त्यांना होती. मात्र साहित्य व्यवस्थित लावत असताना ते सोन्याचे दागिणे त्यांच्याच घरात आढळून आले.
- सतीश इंगळे, प्रभारी ठाणेदार, वरूड