अमरावती : एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढताना घटनास्थळी पडलेल्या मोबाईलमुळे मंगळसूत्र चोरांना गजाआड करण्यात राजापेठ पोलिसांना यश आले. रविवारी सायंकाळी बडनेरा रोडवरील डी-मार्टजवळ चेनस्नॅचिंग करताना एका आरोपीचा मोबाईल घटनास्थळी पडला होता. त्या मोबाईलमधील क्रमांकाहून राजापेठ पोलिसांनी सोमवार १३ डिसेंबर रोजी सकाळी चौघांना ताब्यात घेतले. त्यातील दोघांनी डी-मार्टजवळ घडलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
रोहन ज्ञानेश्वर टिके (२३, सेलू, वर्धा), प्रतीक सुनील वाणी (२२, आंजी, वर्धा) अशी मुख्य आरोपींची, तर त्यांना सहकार्य करणार्या व निवारा देणाऱ्यांमध्ये प्रतीक प्रकाश काळे (२२, रा. आंजी) व आयुष रमेश चांदेकर (२२, रा. वर्धा) यांचा समावेश आहे. डी-मार्टच्या बाजूच्या रस्त्याने एका महिलेला अडवून तिच्या गळ्यातील ३५ ग्रॅमपैकी १५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र घेऊन दोघे रफूचक्कर झाले. १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.४५ च्या सुमारास ही घटना घडली.
ती महिला बडनेरा रोडवरील डी-मार्टकडून घरी पायी जात असताना एक इसम त्यांच्या मागून आला. तिला अडवून गळ्यातील ३५ ग्रॅमची सोन्याची पोत हिसकली. प्रतिकार केल्याने त्या पोतेमधील सुमारे १५ ग्रॅमचे सोने घेऊन तो समोर उभ्या असलेल्या दुचाकीवर मागे बसला व यानंतर अज्ञात दोघे दुचाकीने पळून गेले. त्या झटापटीत एका चोराचा मोबाईल घटनास्थळी पडला. तेथे एका प्रत्यक्षदर्शीने चेनस्नॅचर्सच्या दुचाकीचा क्रमांकदेखील सांगितला. ती सर्व माहिती घेऊन त्या महिलेच्या मुलीने राजापेठ पोलीस ठाणे गाठले. तो मोबाईलदेखील पोलिसांना देण्यात आला. महिलेच्या मुलीच्या तक्रारीवरून दुचाकीस्वारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
असा झाला उलगडा
घटनास्थळी आढळलेल्या मोबाईल हाती घेताच त्यातील डेटा डिलिट होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. ठाणेदार मनीष ठाकरे यांनी त्यासाठी सायबर पोलिसांची मदत घेतली. त्या मोबाईलमधील एक क्रमांक प्रतीक काळे म्हणून ट्रॅक झाला. त्याला सोमवारी सकाळी आंजी येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या माहितीवरून अन्य तिघांनादेखील वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान डी-मार्टमधील रविवारच्या घटनेत रोहन टिके व प्रतीक वाणी होते. घटनास्थळी प्रतीक वाणीचा मोबाईल पडल्याचेही निष्पन्न झाले.
रोहन, प्रतिकने चोरली दुचाकी
राजापेठ पोलिसांनी सोमवारी सायंकाळपर्यंत चौघांचीही कसून चौकशी केली. त्यात रोहन व प्रतीक वाणी यांनी अमरावतीहून दुचाकी चोरली. १२ डिसेंबरच्या घटनेत ती वापरली. रोहन व प्रतिकला आयुष चांदेकरने येथील भुतेश्वर चौकात असलेल्या त्याच्या भाड्याच्या खोलीत आसरा दिला होता. आयुष हा येथे बी.टेक. झाला, तर प्रतीक काळे हा नागपूरला बी.टेक. करीत आहे. रोहन टिकेविरुद्ध दिल्ली पोलिसांत चेनस्नॅचिंगचे २० ते २२ गुन्हे नोंद असल्याची माहिती राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी दिली.