१७ ची डेडलाईन : गोंडाणे करणार उपोषण अमरावती : डागा सफायर या निर्माणाधीन इमारतीच्या कर्त्याधर्त्यांनी ग्राहकांची फसवणूक चालविली असली तरी महापालिकेतील गोल्डन गँगचे काही सदस्य बचावासाठी पुढे सरसावले आहेत. डागा यांनी स्वखर्चातून शहरातील काही दुभाजकांसह चौकांचे सौंदर्यीकरण हाती घेतले आहे. सहकार्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात. त्यामुळे महापालिका यंत्रणेने त्यांच्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी रदबदली केली जात आहे. त्यामुळे १७ आॅगस्टनंतर महापालिका आयुक्त नेमकी कुठली भूमिका घेतात, याकडे व्यावसायिकांसह शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी राजेश डागा यांना महापालिकेकडून २ आॅगस्टला नोटीस पाठविण्यात आली आहे. डागा यांना १५ दिवसांमध्ये बाजू मांडायची असून त्यांनतर पुढील कारवाईची दिशा निश्चित होणार आहे. ए,बी आणि सी या तीन इमारतींमध्ये डागा यांनी केलेले ३४९६.३२ चौरस मीटर बांधकाम अनधिकृत ठरविण्यात आले आहे. १५ दिवसांची ही मुदत १७ आॅगस्टला संपुष्टात येत असून डागा सफायरचे अवैध बांधकाम ते स्वत: पाडतात की महापालिकेचा गजराज त्यावरून फिरविला जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. डागा सफायरच्या ए,बी आणि सी या तीन इमारतींमधील बांधकाम अनधिकृत ठरविण्यात आले. त्यानंतर गोल्डन गँगमधील दोघांनी डागा यांची तळी उचलून धरली आहे. यासाठी आयुक्तांना गळ घातली जात आहे. स्वातंत्र्यदिनापासून आंदोलन ३४९६.३२ चौरस मीटर अनधिकृत बांधकाम करणाऱ्या डागा सफायरविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी स्थायी समिती सदस्य तथा बसपाचे नगरसेवक अजय गोंडाणे १५ आॅगस्टला ध्वजारोहणानंतर बेमुदत उपोषण करणार आहेत. डागा सफायरसह शहरात अन्यत्र सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने टाच आणावी, अशी मागणी गोंडाणे यांनी केली आहे. पुढील आमसभेतही त्यांनी याबाबत प्रस्ताव टाकला आहे.
-आता डागा सफायरच्या मदतीला ‘गोल्डन गँग’
By admin | Published: August 12, 2016 12:11 AM