आॅनलाईन लोकमतअमरावती : राजापेठ स्थित कोठ्यासह कंपोस्ट डेपोत बेवारस पडलेल्या भंगाराची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना, त्यात गोलमाल करण्यासाठी एक तिकडी सरसावली आहे. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या एका कर्मचाऱ्याने त्यासाठी मर्जीतील कंत्राटदारांशी संधान बांधले आहे.प्रचंड चर्चेत असलेला भांडार विभाग भंगाराच्या विक्री व्यवहारात कुठलीही रिस्क घेण्याच्या मनस्थितीत नाही. मात्र, कोळशाच्या दलालीत हात काळे होण्याचा हा प्रकार असताना भंगारविक्रीत याआधी एका कंत्राटी अधिकाºयाने ‘माया’ जमविल्याने अख्खी प्रक्रियाच संशयाच्या भोवºयात आली आहे. मागील दीड वर्षापासून सुरू झालेली भंगार विक्रीची फाइल किंमत ठरविण्यासह समिती नियुक्ती व बैठकांपुरती मर्यादित राहिली असून, अतिक्रमण आणि बांधकामासह स्वच्छता विभागाची भूमिका यात निर्णायक असणार आहे.बांधकाम, अतिक्रमण व स्वच्छता विभागातील निकामी झालेल्या वस्तू, अतिक्रमण पथकाने जप्त केलेले साहित्य, जुने कंटेनर, मोबाइल टॉवरसह अन्य हजारो वस्तू राजापेठ स्थित ‘कोठा’ या परिसरात ठेवण्यात आले आहे. मागील अनेक वर्षांपासून या साहित्याचा लिलाव न झाल्याने त्यातील बहुतांश वस्तू भंगार झाल्यात. याशिवाय सुकळी कंपोस्ट डेपो परिसरात १०० हून अधिक लोखंडी कंटेनर व वलगाव रोडवर ५० पेक्षा अधिक कंटेनर भंगार अवस्थेत बेवारस पडले आहेत. या संपूर्ण भंगाराची विक्री केल्यास सुमारे २ कोटी रुपये महसूल अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने भांडार विभागाने त्यासाठीची फाइल चालविली. मात्र, वर्षभरापासून ही प्रक्रिया अंतिमतेपर्यंत पोहोचू शकली नाहीत. सुरुवातीला भंगारमध्ये ७१७६ वस्तू असल्याचे भांडारने त्यांच्या अहवालात म्हटले. मात्र, त्यावर विश्वास न बसल्याने अतिक्रमण, बांधकाम व स्वच्छता विभागाकडे ही जबाबदारी देत भंगार वस्तूंची पुन्हा मोजदाद करण्यात आली. यासाठी नेमलेल्या समितीसमोर याबाबत अहवाल सोमवारी ठेवला जाईल व त्यानंतर ई-आॅक्शनचा मार्ग प्रशस्त बनेल. मात्र, त्यासाठी ई-लिलाव न करता मर्जीतील कंत्राटदारांना समोर करण्याचा घाट रचण्यात आला आहे. यात तिघे कर्मचारी संशयात आले आहेत. भंगारातून कमिशन खाण्याचा हा प्रकार आहे.संख्या कमी दाखविण्याची बदमाशीकोठ्यासह सुकळी व वलगाव मार्गावर नादुरुस्त कंटेनर व अन्य साहित्य ठेवण्यात आले आहे. मात्र, त्यातील काही भंगार वस्तूंसह अन्य साहित्याची संख्या कमी दाखविण्याचा घाट रचण्यात आला आहे. प्रत्यक्षात ई-आॅक्शनमध्ये भंगार संख्या कमी दाखवायची व प्रत्यक्षात असलेले भंगार चढ्या दराने विकायचे, कोठ्याव्यतिरिक्त बेवारस पडलेले भंगार परस्पर विक्री करायचे आणि त्यातून लाखोंचा मलिदा लाटायचा, असा डाव आखण्यात आला आहे.
भंगारात ‘गोलमाल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 10:07 PM
राजापेठ स्थित कोठ्यासह कंपोस्ट डेपोत बेवारस पडलेल्या भंगाराची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना, त्यात गोलमाल करण्यासाठी एक तिकडी सरसावली आहे.
ठळक मुद्देसाठा कमी दाखविण्याचे षडयंत्र : मर्जीतील कंत्राटदारांसाठी फिल्डिंग