आॅनलाईन लोकमतअमरावती : महापालिकेचे पशू शल्यचिकित्सक सुधीर गावंडे यांच्या आत्महत्येस १८ दिवस पूर्ण होत असताना राजापेठ पोलीस अंधारात चाचपडत असले तरी याप्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. यामुळे सचिन बोंद्रे हे गावंडे यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाला बळ मिळत आहे.गावंडे यांनी विभागप्रमुख म्हणून अधिनस्थ सचिन बोंद्रे यांना वेळोवेळी माहिती मागितली. त्यासाठी कारणे दाखवा नोटीसही बजावल्या. मात्र, बोंद्रे यांनी गावंडे यांच्या नोटीसना केराची टोपली दाखविली. बोंद्रे यांच्याकडून माहिती देण्यास कुचराई होत असल्याने गावंडे अडचणीत आले. मागविलेली माहिती बोंद्रे देत नसल्याने गावंडे यांना वेळोवेळी वरिष्ठांच्या संतापाला सामोरे जावे लागले. विभागप्रमुखांच्या बैठकीसह अनेक आमसभांमध्ये गावंडे हे ‘सॉफ्ट टार्गेट ठरले’. बोंद्रे यांनी माहिती वा अहवाल न दिल्याने आमसभेत ते अनेकदा पुरेशी माहिती सभागृहाला देऊ शकले नाही. बोंद्रे यांच्या बेजबाबदारपणामुळे गावंडे यांना वरिष्ठांसह तक्रारदारांनाही उत्तर देणे कठीण होत असल्याची बाब यानिमित्ताने उघड झाली आहे.
बोंद्रेंची कार्यप्रणाली सदोष१३ व्या वित्त आयोगातील निधी अंतर्गत खरेदी केलेल्या साहित्याच्या नस्तीबाबत बोंद्रे यांना विचारणा करण्यात आली. कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतरही ती नस्ती देण्यास बोंद्रे यांनी टाळाटाळ केल्याबद्दल गावंडे यांनी त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिले होते. माहिती अधिकारामधील प्रलंबित प्रकरणाबाबत बोंद्रे यांनी टाळाटाळ केली. बोंद्रे यांच्या प्रशासकीय लेटलतिफीचा भुर्दंड मात्र विभागप्रमुख म्हणून गावंडे यांना बसला. सहायक पशू शल्यचिकित्सक म्हणून बोंद्रे यांचे कार्यक्षेत्र निश्चित होते. मात्र, बोंद्रे यांनी गावंडे यांचे आदेश कधीही पाळले नाहीत. वेळोवेळी कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतरही बोंद्रे यांची कार्यप्रणाली सदोष राहिल्याने गावंडे हतबल झाले होते. महापालिकेतील पशू शल्यचिकित्सक विभागप्रमुख सुधीर गावंडेंसह उपायुक्तांनी बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसमधील मुद्द्यांंचा अभ्यास केल्यास बोंद्रे यांचे खरे रूप बाहेर येईल आणि राजापेठ पोलिसांच्या चौकशीला दिशा मिळू शकेल, अशी प्रतिक्रिया महापालिका वर्तुळात उमटली आहे. अनेकदा गावंडे यांना केवळ बोंदे्र यांच्यामुळेच अधिकाऱ्यांचा रोष सहन करावा लागला, हे वास्तव महापालिका दस्तऐवजातून स्पष्ट झाले आहे.गावंडे कुटुंबीय न्यायालयात !गावंडे यांच्या पत्नी जया आणि वडील साहेबराव गावंडे यांनीही बोंद्रे यांच्यावरच सर्वाधिक ठपका ठेवला आहे.त्यापार्श्वभूमिवर सुधीर यांचे वडीलबंधू मनोज यांनी बोंद्रे यांच्याबाबत महापालिकेला काही दस्तऐवज माहिती अधिकारातून मागितला आहे. राजापेठ पोलिसांनी न्याय न दिल्यास गावंडे कुटुंब न्यायालयात दाद मागण्याची शक्यता या घटनाक्रमावरून बळावली आहे. बोंदे्र यांच्याबाबत मागितलेली माहिती आपणास न्यायालायीन कामाकरिता अत्यावश्यक असल्याचे मनोज गावंडे यांनी म्हटल्याने त्याला दुजोरा मिळाला आहे.अवाजवी राजकीय हस्तक्षेप११ डिसेंबर रोजी गळफास घेऊन आत्मघात करून घेणाºया गावंडे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राजापेठ पोलिस चौकशी करत आहेत. या प्रकरणाशी मोठ्या अधिकाऱ्यांची नावे जुळल्याने आणि त्यातच राजकीय हस्तक्षेप होत असल्याने पोलिसांसाठी हे प्रकरण ‘हायप्रोफाइल’ ठरले आहे. या प्रकरणात प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांसोबतच राजकीय व्यक्तींनी ‘इंटरेस्ट’ दाखविल्याने या प्रकरणाच्या चौकशीबाबत पोलिसांनी अर्थपूर्ण मौन धारण केले आहे.