अमरावती : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या नवनिर्मित सभागृहाला स्व. दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्याचा पारीतठराव तात्काळ रद्द करावा, अशी मागणी ट्रायबल फोरम अमरावती जिल्हाध्यक्ष दिनेश टेकाम यांनी केली आहे. या संदर्भात गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुंना पत्र पाठविण्यात आले आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीवीर शहिद बाबूराव शेडमाके यांनी दिलेले योगदान इतिहासात अजरामर झाले. गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीमागे आदिवासींसह सर्वहारा बहुजन समाजाचा शैक्षणिक विकास व्हावा, गोंडवाना विद्यापीठातील संशोधनातून त्यांच्या दुःख-दारिद्रय समस्यांचे निराकरण करण्यासाठी विद्यापीठातील शोध-संशोधनाच्या आधारावर कल्याणकारी धोरणे राबविण्यास सरकारला बळ मिळावे, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील आदिवासी थोर महापुरूषांनी केलेल्या व्यापक लोकहिताच्या कार्याबाबत कृतज्ञ राहून आदिवासींचा आत्मसन्मान वाढवावा, अशी भूमिका गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीमागे असल्याचे केंद्र व राज्य सरकारने अनेकदा जाहीर केले आहे. मात्र, १७ जानेवारी २०२३ रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेटने नवनिर्मित सभागृहाला गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाच्या जडणघडणीत कोणतेही योगदान नसलेल्या आणि जनमानसाला माहित नसलेल्या एका विशिष्ट संघटनेचे स्व. दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देऊन विद्यापीठाच्या मूळ ध्येयधोरणांनाच हरताळ फासण्यात आला आहे.
विद्यापीठ सिनेट अंतर्गत बहुमताने घेतलेला हा निर्णय असल्याची माहिती प्रसारमाध्यमांतून प्रकाशित झाली. परंतु सिनेटमधील बहुमताच्या जोरावर गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील थोरपुरूष व लोकनेत्यांचे योगदान आऊटडेडेट करायचे आणि इथल्या मातीशी कुठलाही संबंध नसलेल्या व्यक्तीला महापुरूष ठरवून आमच्यावर निर्णय लादायचा, हा आदिवासींसह सर्वहारा बहुजन समाजाची अस्मिता आणि आत्मसन्मान पायदळी तुडविणारा ठराव असल्याची भावना आदिवासींची आहे.
गोंड राजांचा वैभवशाली इतिहास
गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती करताना चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच प्राचीन गोंडवाना भूभागाचा समृद्ध इतिहास लक्षात घेण्यात आला होता. या दोन्ही जिल्ह्यांवर गोंड राजांनी तब्बल ७०० वर्षे राज्य केल्याचा इतिहास उपलब्ध आहे. येथील सामाजिक व सांस्कृतिक वैभवाचे साक्षीदार म्हणून अनेक गडकिल्ले व मंदिरे आजही उभी आहेत. या वैभवाचा अभिमान केवळ आदिवासी नव्हे तर सर्वांनाच आहे. लोककल्याणकारी, क्रांतिवीरांची नावे द्या
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील अग्रणी क्रांतीवीर शहिद बाबूराव शेडमाके, चंद्रपूरची लोककल्याणकारी राणी हिराई, विदर्भातील जबरानजोत आंदोलनाचे जनक नारायणसिंह उईके, गडचिरोली जिल्हा निर्मितीचे अध्वर्यु बाबूराव मडावी तसेच वंचित समाजाच्या कल्याणासाठी संघर्ष करून लोकप्रिय नेते स्व. सुखदेवबाबू उईके यांच्यापैकी कुणाही आदिवासी लोकनेत्याचे नाव गोंडवाना विद्यापीठाच्या नवनिर्मित सभागृहाला द्यावे, अशी मागणी ट्रायबल फोरम जिल्हाध्यक्ष दिनेश टेकाम यांनी केली आहे.