नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, साथीच्या आजारांचा समूळ नायनाट व्हावा, याकरिता देशव्यापी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्याकरता अनुदान दिले. त्यामुळे घरोघरी शौचालय बांधण्यात आले. परंतु, त्याचा वापर होणे आवश्यक असताना बहुतांश ग्रामस्थांकडून त्याचा वापर होत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक गावांमध्ये प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर दुर्तफा हगणदारीची साम्राज्य पसरले असल्याने गावांमध्ये दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सुरुवातीला ज्या स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून सकाळी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी गुड मॉर्निंग पथकाची धास्ती बसली असल्याने ग्रामस्थ शौचालय वापर करीत होते. परंतु, आता अशा प्रकारची भीती ग्रामस्थांच्या मनात राहिली नसल्याने उघड्यावर शौचास जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने उघड्यावर जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच गुड मॉर्निंग पथकाकडून अशा ग्रामस्थांवर दंडात्मक कारवाई सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
बॉक्स
गावात शिरताच सुटते दुर्गंधी
पावसाळा सुरू झाला असून आता ग्रामीण भागात सद्यस्थितीत बाहेरून गावात प्रवेश करताना किंवा गावातून बाहेर जात असताना दुर्गंधी सुटत आहे. परिणामी गावकऱ्यांना नाकाला रुमाल लावून जावे लागत असल्याचे चित्र आहे. शाैचालयाचा वापर केले जात नसल्याने गावात दुर्गंधी पसरली असून रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बॉक्स
शौचालयात भंगार
वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून लाभार्थींना १२ हजार रुपये अनुदान देण्यात आले. अनेकांनी हे अनुदान मिळविण्यासाठी नुसत्या शौचालयाच्या उभारले. अनेक जण शौचालयाचा वापर भंगार साहित्य अथवा सरपण ठेवण्यासाठी करीत असल्याचे वास्तव आहे.