अमरावती - नक्षलग्रस्त गडचिरोली, अहेरी तसेच गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील क्षेत्रातील कार्यरत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या वेतनाच्या दीडपट दराने वेतन आणि महागाई भत्ता मिळणार आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने सोमवारी हा निर्णय घेतला असून, दसऱ्यापूर्वी ही गूड न्यूज ठरली आहे.
नक्षलग्रस्त अथवा अतिसंवेदनशील क्षेत्रात कर्तव्य बजावणे ही बाब मोठी जोखीमेची आहे. प्रत्येक क्षणाला जीव मुठीत घेऊन पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था हाताळावी लागते. पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना नक्षलग्रस्त भागात कधी जीव गमवावा लागेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे राज्य शासनाने विशेष बाब म्हणून पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेतनात घसघसीत वाढ केली आहे.
यात गडचिरोली, अहेरी नक्षलग्रस्त आणि गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन, महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. तसेच या भागात कार्यरत राज्य गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेतनाच्या दीडपट दराने वेतन आणि महागाई भत्ता मिळेल, असे गृह विभागाचे सचिव संजय खेडेकर यांनी स्पष्ट केले आहे.
‘त्या’ राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांना मिळणार लाभ -राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या नक्षलग्रस्त गडचिरोली, अहेरी आणि गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील क्षेत्रात कार्यरत असतात. राज्य शासनाच्या नवीन निर्णयानुसार राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांनी कर्तव्य बजावलेल्या कालावधीतील वेतन, महागाई दीडपट देण्यात येणार आहे. मात्र, या भागात सामान्य प्रशासनाकडून नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना ही नियमावली लागू असणार नाही, असे शासनादेशात म्हटले आहे.