लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मधील वर्ष २०२४ पासून प्रवेशित प्रशिक्षणार्थीच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांना सामूहिक अपघात विमा लागू करण्यात आला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे. याचा शासन निर्णय २९ जुलै रोजी निघाला आहे.
'आयटीआय'मध्ये आता अनेक आधुनिक यंत्र येत असून त्याचे प्रशिक्षण घेताना अपघात घडून विद्यार्थ्यांवर मृत्यूचा प्रसंगसुद्धा ओढवू शकतो. याअनुषंगाने वार्षिक प्रशिक्षण शुल्क सदराखाली शासकीय, तसेच खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीसाठी सामूहिक अपघात विमा लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा निर्णय प्रशिक्षणार्थीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. याकरिता राज्य आयटीआय निदेशक संघटनेचे पदाधिकारी यांनी मुंबईचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांच्याकडे विम्यासंदर्भात मागणी केल्याचे निरंजन मुरादे यांनी स्पष्ट केले.