अमरावती : सन २०२३-२४ हे आर्थिक वर्ष संपुष्टात आले असले तरी, महापालिकेने थकीत व सन २०२४-२५ वर्षाच्या कर भरणा रकमेवर सवलत जाहिर केली आहे. ज्या मालमत्ताधारकांनी सन २०२३-२४ चा कर भरला नाही, अशांना देखील आता ३० जूनपर्यंत ती थकीत रक्कम सवलतीसह भरता येणार आहे. सोबतच, सन २०२४-२५ चा कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना देखील थकीत मालमत्तांप्रमाणेच किमान १३ टक्के सूट मिळणार आहे. दरम्यान सन २०२३-२४ मधील एकुण मागणी असलेल्या २२० कोटींच्या तुलनेत ४५ कोटी रुपये वसुली झाली आहे.
शहरातील सर्व मालमत्ता धारकांना त्यांचा मालमत्ता कर महापालिकेच्या तीन संकेतस्थळावर ऑनलाईनसह झोन कार्यालयात देखील भरता येणार आहे. थकित कर असल्यास विलंब शुल्क शास्ती पुर्णत: माफ करण्यात आले असून चालू कराच्या भरण्यावर देखील सामान्य करात १० टक्के सूट महानगरपालिकेतर्फे देण्यात आली आहे. यासोबतच ऑनलाइन कराचा भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांना तीन टक्के व महिलांच्या नावे असलेल्या मालमत्तेस पाच टक्के अतिरिक्त कराची सवलत देण्यात आली आहे. तसेच सौर ऊर्जा प्रकल्प व रेन वॉटर हार्वेस्टिंग असल्यास देखील सवलत देण्यात येणार आहे. सर्व मालमत्ताधारकांनी महापालिकेच्या संकेतस्थळावरील मालमत्तेचा नवीन क्रमांक व नावानुसार ३० जूनपुर्वी कराचा भरणा करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. असा भरा टॅक्स
महानगरपालिकेतर्फे वैयक्तिक लिंक असलेल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मालमत्ता निहाय एसएमएस पाठविण्यात आले आहेत. त्यावरून देखील मालमत्तेचे देयक डाऊनलोड करून कराचा भरणा करता येऊ शकतो. महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर मालमत्ता सर्च करण्याकरिता महानगरपालिकेतर्फे बजावण्यात आलेल्या नोटीस तथा देयक वरील नवीन मालमत्ता क्रमांक किंवा युपिक आयडीचा उपयोग करण्याचे आवाहन कर मुल्य निर्धारक व संकलन अधिकारी तथा उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी केले आहे.