- अनिल कडू परतवाडा (अमरावती) : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०१९-२० अंतर्गत राज्यातील ३.०४ कोटी शेतक-यांकरिता विमा कंपनीला ९८ कोटी ५ लाख ७५ हजार ८३४ रुपये देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसा शासन निर्णय ५ डिसेंबर रोजी निर्गमित झाला. यात शेतकºयाला २ लाखांचे विमा कवच विनामूल्य पुरविण्यात आले आहे.
यात शेतक-यांना स्वत: किंवा त्यांच्या वतीने कुणासही विमा हप्ताची रक्कम भरण्याची गरज नाही आणि या विमा योजनेंतर्गत मिळणारा लाभही स्वतंत्र आहे. राज्यातील १० ते ७५ वयोगटातील सातबाराधारक शेतक-यास किंवा शेतक-यांच्या वारसास हा लाभ दिला जाणार आहे. ८ डिसेंबर २०१९ ते ७ डिसेंबर २०२० या कालावधीकरिता हे विमा कवच आहे. दी युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. ही कंपनी सदर अपघात विमा योजना राबविणार आहे.या विमा कंपनीला प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष ३२ रुपये २३ पैसे इतका विमा हप्ता देण्याचे शासनाने मान्य केले आहे. या हप्त्यापोटी ३.०४ कोटी शेतक-यांचे ९७ कोटी ९७ लाख ९२ हजार दिले जाणार आहेत. याच योजनेंतर्गत सल्लागार कंपनी असलेल्या जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लि. ७ लाख ८३ हजार ८३४ रुपये मिळणार आहेत. विमा हप्ता रकमेचे विमा कंपनीला प्रदान झाल्यापासून १२ महिने कालावधीसाठी विविध अपघातापासून ही कंपनी शेतक-यांना संरक्षण देणार आहे. ही योजना राबविण्याची जबाबदारी आयुक्त (कृषी) यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
या आपत्तींचा समावेश राज्यात शेती व्यवसाय करताना होणा-या अपघाताचा यात समावेश आहे. वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे ब-याच शेतक-यांवर मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते. यात अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास नुकसानभरपाई म्हणून शेतक-यास किंवा त्यांचे वारसास दोन लाख रुपये मिळणार आहेत. यात त्याचा मुख्य व्यवसाय शेती आणि तो शेतकरी असावा हीच तेवढी अट घालण्यात आली आहे.