अमरावती : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये धोक्यात आलेले ओबीसीचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य शासनाने त्वरित योग्य निर्णय घेऊन ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी गोर सेनेतर्फे १७ ऑगस्टपासून जिल्हा कचेरीसमोर साखळी उपोषण सुरू केले आहे.
मागासवर्गीय अधिकारी - कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण लागू करावे, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी, नवी मुंबई येथील विमानतळाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे संयुक्त पूर्वपरीक्षेचे सर्व वेळापत्रक त्वरित जाहीर करावे. बार्टीच्या धर्तीवर सारथी प्रमाणे, महाज्योतीला ३ हजार करोड रुपये निधी उपलब्ध करून द्यावा, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना सुरू करून प्रतिनिधींची नियुक्ती करावी आदी मागण्यांसाठी गोर सेनेने जिल्हा कचेरीसमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम चव्हाण, राजेश चव्हाण, मदन राठोड, युवराज चव्हाण, पंकज चव्हाण, मुकेश चव्हाण, हरिभाऊ राठोड, सुधीर जाधव, वीरेंद्र राठोड, संदीप कुमरे, संतोष भोयर, नरेश नीतनवरे, डी. बी. पाटील, मंगला जुमळे आदींसह पदाधिकारी सहभागी झाले आहेत.