लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : दर्यापूर अंजनगाव मार्गावरील रामचंद्र बार परिसरालगत गोवंशासह विनाक्रमांकाचे वाहन जप्त करण्यात आले. १५ जून रोजी रात्री ११ ते १२.३० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मो. साबिर शेख रफिक (रा. करजगाव) व शेख सादिक शेख सुफी (रा. बैतूल) यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.परतवाडा-अंजनगाव मार्गे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनातून गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती अंजनगावच्या डीबी पथकास मिळाली. त्यावरून ते वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता, वाहनचालकाने दर्यापूरकडे वाहन पिटाळले. मात्र, पाठलागाअंती रामचंद्र बारमागे याला १५ जून रोजी रात्री १२.३० च्या सुमारास पकडण्यात आले. वाहनांची तपासणी केली असता त्यात सहा गायी पाय बांधलेल्या अवस्थेत आढळल्या. वाहनसुद्धा विनाक्रमांकाचे होते. वाहनचालक मो. साबीर शेख रफिक (४२ रा. भटीपुरा करजगाव) व शेख सादिक शेख सुफी (२७ रा. आठनेर, जि. बैतूल) यांना अटक करून एक लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. कोंबून आणलेल्या गायीची वैद्यकीय तपासणी केली असता, त्यातील एक गाय मृत आढळली. ठाणेदार नरेश पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी स्कॉडचे किशोर घुगे, गोपाल सोळंके यांनी ही कारवाई केली.
गोवंशाची तस्करी, दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 1:24 AM