चांदूर बाजार (अमरावती) : स्थानिक ग्रामीण रुग्णालयासतील १०२ या रुग्णवाहिकेचा चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवीत असल्याने मोठा अपघात झाला. सुदैवाने त्या रुग्णवाहिकेत त्यावेळी कोणताही रुग्ण नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र यात मद्यधुंद चालक जखमी झाला आहे.
नागरिकांच्या आरोग्यसेवेकरिता शासनातर्फे रुग्णवाहिकेची सुविधा आहे. रुग्णांना २४ तास सुविधा मिळावी याकरिता १०२ ही शासनाची रुग्णवाहिका आहे. मात्र या रुग्णवाहिकेचा चालकच मद्यधुंद अवस्थेत शासनाची रुग्णवाहिका दररोज चालवीत असेल तर त्यामधील रुग्णांच्या जिवाची काळजी कोण घेणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
रविवारी रात्री ११.३० वाजता असाच प्रकार तालुक्यातील बोराळा येथून चांदूर बाजारकडे येत असताना घडला. स्थानिक ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेमधील चालक किशोर राऊत मद्यप्राशन करून रुग्णवाहिका चालवीत होते. अशात रुग्णवाहिकेवरून नियंत्रण सुटल्याने बोराळा गावाजवळ ही रुग्णवाहिका नाल्याच्या खड्ड्यात जाऊन अडकली. यात सुदैवाने कोणताच रुग्ण नसल्याने जीवितहानी टळली. मात्र चालक किशोर राऊत यांच्या डोक्याला, तोंडाला जबर मार लागला.
घटनेची माहिती मिळताच प्रहार रुग्णवाहिकेचे चालक हेमंत कोंडे घटनास्थळी पोहोचले. गावकऱ्यांच्या मदतीने जखमी चालक किशोर राऊत यांना रुग्णवाहिकेबाहेर काढण्यात आले. त्यांना उपचारासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात नेत असताना नशेत असलेल्या चालकाने मात्र ग्रामीण रुग्णालयात जाण्यास नकार दिला. अखेर चालक राऊत यांना जबरदस्तीने रुग्णवाहिकेत टाकून आणण्यात आले.