अमरावती : जिल्ह्यातील काही गावात १८ जुलै रोजी अतिवृष्टी होऊन ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये शेतीचे तसेच घरातील वस्तूंचेही नुकसान झाले होते. आपादग्रस्तांचे संसार पुन्हा उभे राहावे, यासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात साडेसात सात हजार रुपयांचा सानुग्रह निधीचे धनादेश संबंधितांना सुपूर्द करण्यात आहे. जनसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी येथे केले.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शिराळा, साऊर व खारतळेगाव येथील ग्रामस्थांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सानुग्रह निधीचे धनादेश वितरित करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. अमरावती पंचायत समितीच्या सभापती संगीता तायडे, पदाधिकारी अलका देशमुख, जयंत देशमुख, उपविभागीय अधिकारी रणजित भोसले, नरेंद्र फुलझेले, तहसीलदार संतोष काकडे, नीता लबडे यांच्यासह संबंधित गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते.
अतिवृष्टीने शिराळा, साऊर व खारतळेगाव यासह लगतच्या गावांत अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान, घरांची पडझड, घरातील कपडे, वस्तू आदींचे नुकसान झाले. शिराळा क्षेत्रातील ८९ कुटुंबांना, साऊर गावातील ३१२ व्यक्तींना सानुग्रह निधीचा साडेसात हजार रुपयांचा पहिला टप्पा धनादेश स्वरुपात वाटप करण्यात आल्याची माहिती ना. यशोमती ठाकूर यांनी दिली.
-------------
अनिल गुडदे यांच्या वारसांना दोन लाखांचा निधी
खारतळेगावातील अतिवृष्टीमुळे नाल्याला आलेल्या पुरात वाहून मृत्यू झालेल्या अनिल गुडदे यांच्या वारसांना दोन लाख रुपये सानुग्रह निधीचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. खारतळेगावातील सहा व्यक्तींना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत २० हजारांचा सानुग्रह निधीचा धनादेश वितरित करण्यात आला. यावेळी पुरात वाहून मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांचे पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले. भांडी, वस्तू नुकसानासाठीची १० हजारांची मदत मिळणार आहे.
---------------------