अमरावती : माजी विरोधी पक्षनेता तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संमती असलेला अमरावती नजीकच्या नांदगाव पेठस्थित औद्योगिक वसाहतीमध्ये पीएम मित्रा योजनेंतर्गत प्रस्तावित टेक्सटाइल पार्क औरंगाबाद येथे पळविण्याचे कारस्थान रचण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गत काही दिवसांपूर्वी केंद्रीय वस्त्रोद्योग, अर्थमंत्र्यांची भेट घेतली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून अमरावतीत प्रस्तावित मेगा टेक्सटाइल पार्क औरंगाबाद येथील ऑरिक सिटीमध्ये पळविण्याचे कारस्थान रचले. या प्रकल्पाला अमरावती येथे केंद्र सरकारने पीएम मित्रा योजनेंतर्गत प्रस्तावित केले होते. देशाच्या १३ राज्यांमधून १७ मेगा टेक्सटाइल पार्क साकारले जाणार होते. त्यानुसार अमरावतीत पार्कसाठी केंद्र सरकारने ४४४५ कोटी रुपये अर्थसंकल्पात उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मेगा टेक्सटाइल पार्कचा प्रस्ताव सादर करण्यासाठी १५ मार्च २०२२ ही डेडलाइन होती. मात्र, आता भाजप - महायुती सरकार सत्तेत येताच षडयंत्र रचून अमरावतीचा टेक्सटाइल पार्क औरंगाबाद येथे पळवून नेला, असा घणाघात डॉ. सुनील देशमुख यांनी केला.
शिंदे सरकारच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा निर्णय होत असताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘ब्र’ देखील काढू नये, यााबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. फडणवीस हे विरोधी पक्ष नेता असताना त्यांनी टेक्सटाईल पार्क हा अमरावती येथेच असावा, असे पत्र दिले होते. त्यामुळे फडणवीस यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्या राजकीय खेळीला मूक संमती तर नाही, अशी शंका उपस्थित होत असल्याचे डॉ. सुनील देशमुख म्हणाले.
खा. राणा, खा. बोंडे यांनी राजकीय वजन वापरावे
अमरावतीचा मेगा टेक्सटाईल पार्क औरंगाबादला पळविला. त्यामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी पक्ष नेतृत्वाकडे राजकीय वजन वापरून हा प्रकल्प पुन्हा आणावा आणि पश्चिम विदर्भातील रोजगार, युवकांच्या आशा, आकांक्षांना पुन्हा पल्लवित करावे. अन्यथा तो जनतेसोबत विश्वासघात ठरेल, अशी टीकाही माजी मंत्री डॉ. देशमुख यांनी केली. येथे अगोदरच २० टेक्सटाईल कंपन्या प्रस्तावित असून, हा मेगा टेक्सटाईल पार्क अमरावतीत खेचून आणण्यासाठी जनआंदोलनाची तयारी करू, असे ते म्हणाले.
क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्प जाण्याच्या मार्गी
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या कार्यकाळात नांदगाव पेठ येथे प्रस्तावित भारत डायनामिक क्षेपणास्त्र निर्मिती करणारा अत्यंत महत्वपूर्ण प्रकल्प सुद्धा अमरावती येथून हैदराबाद येथे जाण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पाचे ११ डिसेंबर २०११ रोजी भूमिपूजन झाले होते. जागेला केवळ संरक्षण कुंपण घालण्यात आले. मात्र, आता केंद्र सरकारच्या धोरणानुसार खासगी कंपन्यांना प्रकल्पाची कामे सोपविणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे अमरावतीत रोजगार निर्मिती प्रकल्प, उद्योगधंदे उभारणीसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. सुनील देशमुख यांनी केले आहे.