अमरावती : दर्यापूर येथील संत गाडगेबाबा सहकारी सुतगिरणी जुलै २००७ पासून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी सिल लावून बंद केली आहे. या सुतगिरणीला राष्ट्रीय कृषि विकास निगम (एनसीडीसी)व राज्य सरकारची मदत लाभणार असल्याचे संकेत मंगळवारी वस्त्रोद्योग मंत्री यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत मिळाले. सद्यस्थितीत गिरणी अवसायानात निघाली आहे. बँकेच्या कर्जाचा बोजा शंभर कोटीच्या घरात पोहचला आहे. या व्यतिरिक्त इतर वित्तीय संस्थेचे कर्ज व कामगारांचे वेतनासह होणाऱ्या रकमा, सद्यस्थितीत २५ कोटी पर्यंत असल्याची माहिती आहे. याविरुद्ध कामगार संघटनेने सातत्याने सूतगिरणीचे पुनर्जिवन करुन उत्पादनात आणण्याकरिता सतत प्रयत्न चालू ठेवले आहे. त्या अनुषंगाने १७ जानेवारीला वस्त्रोद्योग व सहकारी मंत्री सुभाष देशमुख यांचे दालनामध्ये तातडीने बैठक झाली. वस्त्रोद्योग विभागाचे अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अधिकारी, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, कामगार संघटनेचे अध्यक्ष रवि कोरडे यांच्या उपस्थितीत सदर बैठक झाली. यावेळी सूरगिरणी सुरु करुन कशा प्रकारे उत्पादनात आणता येईल या संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावर उपाययोजना करण्याबाबतचे संवाद साधण्यात आला. हा गिरणीचा प्रकल्प जागतिक बँकेचा असून विदर्भातील इतर गिरण्यापैकी हा एक प्रकल्प आहे. या गिरणीला एनसीडीसी व राज्य सरकार सर्वोतोपरी मदत करेल व १४ हजार कामगारांना काम मिळेल. जिल्ह्यातील बंद पडलेल्या इतर सुतगिरण्यांसाठी सातत्याने कामगार संघटनेने पाठपुरावा केला आहे. लवकरच दर्यापूर येथील सुतगिरणीला सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे. मंगळवारी मंत्रालयात ना. सुभाष देशमुख यांच्या दालनात सुतगिरणी सुरु करण्या संदर्भात चर्चा झाली. सुतगिरणी सुरु झाल्यास हजारो कामगारांना रोजगार मिळणार आहे. - रवि कोरडे, कामगार नेते, दर्यापूर
दर्यापूरच्या सुतगिरणीला मिळणार शासनाची मदत !
By admin | Published: January 19, 2017 12:09 AM