प्रदीप भाकरे अमरावती: कोरोनाकाळात सरकारी नोकरी लावून देण्याच्या मोबदल्यात लक्षावधी रुपये उकळणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या मुख्य सुत्रधाराला अटक करण्यात गाडगेनगर पोलिसांना यश आले आहे. त्या ‘दिल्लीच्या ठगा’ची पोलीस कोठडीत खातीरदारी केल्यानंतर त्याची रवानगी अमरावती मध्यवर्ती कारागृहात झाली आहे. अनिल उदय गौतम उर्फ माथूर (३८, विना विहार, उत्तमनगर, दिल्ली) असे त्या अटक ठगाचे नाव आहे.
तर याच ४९.५० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील स्थानिक आरोपी डॉ. श्रीकांत मंगेश बानुबाकोडे (३४, चिराग अपार्टमेंट, एमआयडीसी, अमरावती) याला देखील अटक करण्यात आली असून, त्याला ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अन्य एका आरोपीला याआधीच अटक करण्यात आल्याने या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या तीनवर गेली आहे. पैकी दोघे कारागृहात तर बानुबाकोडे हा पीसीआरमध्ये आहे. प्रिया पार्क येथे राहणाऱ्या एका महिलेच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी मागील महिन्यात पाच मुख्य आरोपींसह दहा अनोळखी अशा एकुण १५ जणांविरूध्द फसवणूक व फौजदारी स्वरूपाचा कट रचल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल केले होते.
अगदी सुरूवातीला एका स्थानिक मुख्य आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर गाडगेनगर पोलिसांनी या रॅकेटच्या दिल्ली कनेक्शनकडे मोर्चा वळविला. आठवड्यापुर्वी गाडगेनगर पोलीस ठाण्याचे एक पथक दिल्लीत जाऊन आले. तेथून सहायक पोलीस निरिक्षक प्रमोद साळोखे यांच्या पथकाने अनिल उदय गौतम उर्फ माथुरला अटक करवून अमरावतीत आणले. पोलीस कोठडीत त्याच्याकडून अनेक बाबींचा उलगडा करवून घेण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने माथूर याला न्यायालयीन कोठडी सुनावली. तर, याच आठवड्यात भंडारा येथून डॉ. बानुबाकोडे याला अटक करण्यात आली. त्याला ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींनी आणखी किती जणांना सरकारी नोकरी लावून देण्याची बतावणी करून ठकविले, याचा तपास सुरू आहे.यांनी केला तपाससीपी नवीनचंद्र रेड्डी, डीसीपी सागर पाटील व सहायक पोलीस आयुक्त पुनम पाटील यांच्या मार्गदर्शनात गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरिक्षक प्रमोद साळोखे, अंमलदार ओम सावरकर, योगेश इंगोले यांनी ही कारवाई केली. त्या तांत्रिक तपासासाठी सायबर पोलिसांचे देखील सहकार्य घेण्यात आले. बोगस सरकारी नोकरीच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन एसीपी पुनम पाटील यांनी केले आहे.