अमरावती : शासकीय दूध योजना कार्यालयाने जिल्ह्यातील संस्थांकडून नियमित दूध संकलित करावे. दूध संकलनात खंड पडू नये. दूध संकलनाचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शनिवारी जिल्ह्यातील दूध पुरवठाधारक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याबाबत बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हाधिकारी पवनीत कौर, दुग्ध व्यवसाय अधिकारी गिरीश सोनवणे, प्रादेशिक दुग्ध विकास कार्यालयाचे विकास तावडे आदी उपस्थित होते.
दुधाची रोजची गरज पूर्ण होण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक दूध संस्थांनी प्रत्येकी ५० लिटर दुधाचा शासकीय दूध योजना कार्यालयाला पुरवठा करावा. जिल्ह्यात सक्रिय सात संस्था शासकीय दूध योजना कार्यालयात दूध पुरवठा करतात. दूध पुरवठा करण्यात नियमितता असावी. दुधाचा तुटवडा निर्माण होऊ नये याबाबत दक्षता घ्यावी, असे ना. ठाकूर यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना सांगितले. यावेळी दूध उत्पादक शेतकरी सुरेश पडोळे, शशिकांत फुलझेले, रोशन गुप्ता, वसंत सातारकर, रंजित राऊत, विनोद चौधरी, आबा वऱ्हाडे उपस्थित होते.