गजानन मोहोड
अमरावती : खासगीत भाव कमी असल्याने शेतकऱ्यांना प्रतीक्षा असलेली हरभऱ्याची शासकीय खरेदी मंगळवारपासून सुरू झालेली आहे. ऑनलाइन नोंदणीची मुदत १५ मार्चला संपुष्टात आलेली असल्याने शेतकरी चिंतेत होते. आता मुदतवाढ आल्याने वंचित शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत नोंदणी करता येणार आहे.
हरभऱ्याचा अद्याप हमीभाव मिळालेला नाही. शासनाने यंदा ५,३३५ रुपये हमीभाव जाहीर केलेला असताना ४३०० ते ४६०० रुपये क्विंटलदरम्यान बाजार समित्यांमध्ये भाव मिळत आहे. त्यामुळे हरभऱ्याला आधारभूत किमतीचे संरक्षण मिळावे, यासाठी नाफेडद्वारा शासनमान्य दराने खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला. २७ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात व्हीसीएमएफ व डीएमओंच्या १६ केंद्रांत ऑनलाइन नोंदणी सुरू झाली. यासाठी एक दिवस अगोदरच शेतकऱ्यांच्या रांगा असल्याने काही ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.