मच्छर फोटो
तालुक्यात डेंग्यूचे शेकडो रुग्ण, दररोज नव्या रुग्णांची भर
अनिल कडू
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागांत डेंग्यूचे शेकडो संशयित रुग्ण आहेत. ही संशयित डेंग्यू रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. खासगी पॅथॉलॉजी लॅबमधून दररोज आठ ते दहा रुग्णांचे अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह येत आहेत.
अचलपूरमधील डेंग्यूवर उशिरा का होईना, शासनाने शिक्कामोर्तब केले. शासकीय प्रयोगशाळेतून पाच अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आले आहेत. हे अहवाल अलीकडच्या रक्तजल नमुन्यातील आहेत. या पाच डेंग्यू रुग्णांमध्ये अचलपूर शहरातील विलायतपुरा, मंजूरपुरा व मेहराबपुरा येथील चार, तर धामणगावगढी येथील एक रुग्ण आहे. अजूनही काही अहवाल प्रतीक्षेत आहेत. रुग्ण दवाखान्यातून बरे होऊन घरी गेल्यानंतरही हे अहवाल अद्याप उपजिल्हा रुग्णालयातील यंत्रणेकडे पोहोचलेले नाहीत. अनेक रक्तजल नमुन्यांचे अहवाल शासकीय प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहेत.
उपचारार्थ खासगी किंवा उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण दाखल होताच, स्थानिक खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये रक्त तपासणींतर्गत त्या रुग्णांची पहिली टेस्ट डेंग्यू पॉझिटिव्ह येत आहे. खासगी प्रयोगशाळेत केली जाणारी डेंग्यू टेस्ट मान्यताप्राप्त व विश्वसनीय आहे. यानुसार खासगी व शासकीय डॉक्टर औषधोपचार त्या रुग्णांवर करीत आहेत. त्याची माहिती ते शासकीय यंत्रणेला देत आहेत. ही यंत्रणा त्या रुग्णाचे एक तर रुग्णालयात जाऊन किंवा त्याच्या घरी जाऊन रक्तजल नमुने गोळा करते. गोळा केलेले हे रक्तजल नमुने अकोला येथील शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविले जात आहेत; पण त्याचे अहवाल वेळेवर शासकीय यंत्रणेला प्राप्त होत नाहीत. तो रुग्ण बरा होऊन घरीसुद्धा जात आहे. यानंतर केव्हा तरी त्या रुग्णाचा शासकीय अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह येत आहे. या डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती संबंधित शासकीय यंत्रणेकडून अचलपूर नगर परिषदेला व ग्रामीण भागात संबंधित ग्रामपंचायतीला दिली जात आहे.
डेंग्यू रुग्णाची शोधाशोध
शासकीय प्रयोगशाळेकडून आलेल्या पाच डेंग्यू पॉझिटिव्ह अहवालांमध्ये एक रुग्ण धामणगाव गढी येथील आहे. या रुग्णाची शोधाशोध धामणगाव गढी येथे ग्रामीण आरोग्य यंत्रणेकडून केली जात आहे; पण अद्याप हा रुग्ण धामणगाव गढी येथे आढळून आलेला नाही.
कोट :
उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत डेंग्यूचे ८१ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यात शहरी भागातील ४८, तर ग्रामीण भागातील ३३ रुग्ण आहेत. शासकीय प्रयोगशाळेकडून पाच रुग्णांचे डेंग्यू अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील चार अचलपूर शहरातील असून, एक धामणगाव गढी येथील आहे.
-डॉ. सुरेंद्र ढोले, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर