अमरावती : कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता, दिल्ली सरकारने २० एप्रिल ते ९ जून २०२१ या कालावधीत शाळांना उन्हाळी सुटी जाहीर केली. याच धर्तीवर राज्य शासनाने शालेय वर्ष समाप्त झाल्याचे घोषित करून ऑनलाईन अध्यापन बंद करावे, सुटीबाबचे आदेश जारी करावे आणि विद्यार्थी, शिक्षकांना २ मेपासून उन्हाळी सुटी जाहीर करावी, अशी मागणी राज्य प्राथमिक शिक्षक समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
कोविड-१९ महामारीमुळे मार्च २०२० पासून शाळांना सुट्टी जाहीर केल्याने शालेय अध्यापन बंद आहे. मात्र, मे २०२० पासून शासनाने ऑनलाईन अध्यापनाचे आदेश जारी केले आहे. त्यामुळे मे २०२० पासून २५ जूनपर्यंत उन्हाळी सुटी असूनही शिक्षक ऑनलाईन अध्यापन करीत होते. त्यानंतर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून आजतागायत ऑनलाईन अध्यापन सुरूच आहे. कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनानेच सुरुवातीला पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट वर्गोन्नती देण्याचे जाहीर केले. त्यानंतर नववी ते अकरावीबाबतही परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला, तर २० ए्प्रिल २०२१ रोजी शिक्षणमंत्र्यांनी इयत्ता दहावीची परीक्षाही रद्द केल्याचे सांगितले. दरवर्षी शालेय वर्षातील अध्यापन समाप्ती मार्चअखेर होऊन एप्रिलमध्ये परीक्षा घेण्यात येतात आणि विद्यार्थी, शिक्षक यांना अध्ययन, अध्यापनातून सुटी मिळते. मात्र, अजूनही उन्हाळी सुटीबाबत निर्णय झाला नाही.
-----------------
बॉक्स
गणपती, दिवाळी, नाताळच्या सुटीतही ऑनलाईन वर्ग
भ्रमणध्वनी किंवा संगणकावर अध्ययन, अध्यापन केल्याने मानेचे त्रासही उद्भवू लागले आहेत तसेच मुलांनाही मोबाईलवरील सततच्या अध्ययनामुळे त्रास होत असल्याबाबत पालकांची तक्रार आहे. मुलेही गेल्या वर्षभरापासून ऑनलाईन क्लास व कोरोनामुळे घरात कोंडून असल्याने पालकांनाही त्यांच्या मूळ गावी जाण्याचे नियोजन करायचे आहे. म्हणून राज्य शासनाने २ मे पासून शाळांना सुटी घोषित करावी, असेही शिक्षक समितीचे प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी म्हटले आहे.