अमरावती : येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेशित ईलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन शाखेतील तृतीय व सहाव्या सत्रातील विद्यार्थी ऑनलाईन तासिकांपासून वंचित आहे. परंपरागत नियमांवलीमुळे वायरलेस ॲन्ड मोबाईल कम्युनिकेशन प्रणाली (ईसी५४६७) या विषयांचे ४० पेक्षा जास्त तासिका (क्रेडिट) मिळत नाही. शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ४० पेक्षा जास्त क्रेडिट मिळावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी सोमवारी प्राचार्यांना निवेदन सादर केले.
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार, इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन शाखेतील तृतीय व सहाव्या सत्रातील विद्यार्थी आहेत. वायरलेस ॲन्ड मोबाईल कम्युनिकेशन प्रणाली या विषयाची नाेंदणी करून देण्यात यावी. ४० क्रेडिटमध्ये आणखी सहा क्रेडिट समाविष्ट करून न्याय प्रदान करावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली. कोरोना संसर्गामुळे महाविद्यालये बंद असून, ऑनलाईन तासिका घेण्यात येत आहे. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, असे धोरण ठरविले आहे. त्यामुळे तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांचे क्रेडिटअभावी एक वर्षाचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. क्रेडिटमध्ये वाढ करावी, अशी मागणी सिद्धांत निताळे, गायत्री धामणे, श्रेया पवार, प्रथम रायकवार, समृद्धी तिडके, सिद्धेश तल्लाहार यांनी केली आहे.
कोट
ऑनलाईन परीक्षा असल्याने तासिका पूर्ण करणे जिकरीचे काम आहे. रोज ७ तासिका असे ४० क्रेडिटचे विद्यार्थी ऑनलाईन तासिकांसाठी नोंदणी करू शकतात. त्यापेक्षा अधिक क्रेडिट असल्यास विद्यार्थी नोंदणी करू शकत नाही. मात्र, सोमवारी तृतीय, सहाव्या सेमिस्टरचे विद्यार्थ्यांचे निवेदन प्राप्त झाले असून, विभागप्रमुखांच्या बैठकीत ही समस्या सोडविण्यात येईल.
- आर.पी. मगरे, प्राचार्च, शासकीय तंत्रनिकेतन