अमरावती : महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे काम बंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू असल्याने शासनाचे कामकाज खोळंबले आहे. बुधवारी महसूल अधिकाऱ्यांनी दोन तास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ठिय्या दिला. काम बंद आंदोलनामुळे अनेक महसूल अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने कार्यालये ओस पडली होती व याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला.
राज्यातील नायब तहसीलदार हे राजपत्रित वर्ग-२ असताना ग्रेड पे ४,८०० रुपये करण्यासाठी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेद्वारा ३ एप्रिलपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ९४ नायब तहसीलदार, तहसीलदार व उपजिल्हाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे महसुली कामकाज खोळंबले आहे. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष नीता लबडे यांच्या नेतृत्वात येथील महसूल विभागाचे सर्व अधिकारी सहभागी झाले आहेत. दरम्यान, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी शासनासोबत बैठक होत असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले.