अमरावती : सन १९६६ मध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भाषण ऐकण्याचे सौभाग्य मला प्रत्यक्षात प्रयागराजमध्ये लाभले. त्यानंतर आज महाराजांच्या समाधीपुढे नतमस्तक होऊन अभिवादन करण्याची संधी मिळाली, असे भावोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले.
अमरावती येथील नियोजित कार्यक्रमाला जाताना बुधवारी सकाळी ११ वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुरुकुंजात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे दर्शन घेतले. त्यावेळी ते बोलत होते. ते तीन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पोलीस प्रशासनाच्यावतीने पहाटेपासूनच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी माध्यमाच्या प्रतिनिधींसोबत त्यांनी संवाद साधला.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या ‘ग्रामगीता’ ग्रंथात समाजोपयोगी कल्याणकारी बाबीचा समावेश असून प्रत्येकाने त्याला आचरणात आणणे गरजेचे आहे. समाधिस्थळावरील शांतता व पावित्र्य मनाला संमोहित करणारे आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांनी ही भूमी पावन झालेली आहे. राष्ट्रसंतांच्या विचारांची ज्योत प्रत्येकाने आपल्या मनात तेवत ठेवावी. हीच खरी त्यांना मानवंदना ठरेल, असे ते म्हणाले. अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विरचित गद्य-पद्य ग्रंथ संपदा, ग्रामगीता तसेच शाल, श्रीफळ देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी अमरावतीचे महापौर चेतन गावंडे, अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे गुरुजी, अध्यात्म विभागप्रमुख डॉ. राजाराम बोथे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे, तहसीलदार वैभव फरताडे, माजी कृषिमंत्री अनिल बोंडे, भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे, पुनसे, नीलेश श्रीखंडे, श्रीकांत कांडलकर आदी उपस्थित होते.