गुरुकुंज(मोझरी): दरवर्षी हजारो गुरुदेवभक्ताच्या उपस्थितीत साजरा होणारा सामूहिक ग्रामजयंती महोत्सव यंदाही कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याचे ग्रामजयंती महोत्सव समितीच्यावतीने कळविण्यात आले आहे. त्यामुळे गुरुकुंज आश्रमात या कालावधीत कोणत्याही गुरुदेवभक्तांनी येऊ नये, असे आवाहन केले आहे.
दरवर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीत हा जन्मोत्सव सोहळा विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून थाटात साजरा केला जातो. यात प्रामुख्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधी स्थळावर परिसरातील शेकडो महिला संघटित होऊन ग्रामगीता ग्रंथामधील १ ते ४१ अध्यायावर क्रमाक्रमाने मार्गदर्शक महिला उपस्थितांना पूरक मार्गदर्शन करतात. साधारणत: १७ मार्च ते २७ एप्रिल दरम्यान ४१ दिवस ग्रामगीता पठण केल्या जात होते. परंतु गतवर्षीपासून याच कालावधीत कोरोना संकट सातत्याने घोंगावत असल्यामुळे यात सामूहिक जन्मोत्सव साजरा करता आला नाही. गुरुकुंजामध्ये याहीवर्षी होणार नाही.
गुरुकुंज आश्रमामध्ये होणारा २८ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंतचा मुख्य ग्रामजयंती महोत्सव हा ग्रामसफाई , ग्रामनाथ शेतकऱ्यांचा सत्कार, त्याचप्रमाणे भजन , कीर्तन, प्रवचन , गोपाल काला व महाप्रसाद अशा विविधांगी कार्यक्रमाने सुसंपन्न होत असतो परंतु कोरोना संक्रमणाने मागील वर्षी पेक्षाही रौद्र रूप धारण केल्यामुळे सध्या सरकारने केलेल्या आवाहनानुसार सर्व नियम पाळणे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य असल्यामुळे हा कार्यक्रम न घेण्याचे समितीने ठरविले आहे. घरूनच गुरुदेव भक्तांनी राष्ट्रसंतांना वंदन करून कृतज्ञता व श्रद्धा व्यक्त करावी. कोणीही गुरुकुंजामध्ये समाधीचे दर्शन घेण्यासाठी किंवा ग्रामजयंती महोत्सवासाठी येऊ नये, सुरक्षित रहा व घरीच राहा, असे आवाहन ग्रामजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण दळवी व सचिव उद्धव वानखेडे यांनी केले आहे.