लोकमत न्यूज नेटवर्कगुरुकुंज मोझरी : ‘गावा गावाशी जागवा, भेदभाव समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा, तुकड्या म्हणे’ या ओळीस अनुसरून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मदिन ग्रामजयंती महोत्सव म्हणून दरवर्षी ३० एप्रिल रोजी उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यंदाचा हा सोहळा राष्ट्रसेवकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यापुरता मर्यादित स्वरूपात साजरा होणार आहे.दरवर्षी तीन दिवस हा महोत्सव ग्रामजयंती म्हणून हजारो अनुयायांच्या उपस्थितीत उत्स्फूर्तपणे साजरा केला जातो. यंदा कोरोनाच्या विश्वव्यापी संकटामुळे इतिहासात पहिल्यांदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची महासमाधी कुलूपबंद आहे. त्याच परिसरात दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो. लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढल्याने यंदा ग्रामजयंती महोत्सव प्रत्येक भाविकाने घराघरांतून राष्ट्रसंत विरचित विजयी संकल्पगीत ‘तन-मन-धन से सदा सुखी हो भारत देश हमारा’ या राष्ट्रवंदनेचे गायन करायचे आहे. या संकटप्रसंगी सर्वांसाठी अविरत सेवा देणाऱ्या राष्ट्रसेवकांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतुने ३० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता सत्संकल्पाचे दीप प्रज्वलित करून कुटुंबीयांसह घरातच साजरा करण्याचे आवाहन अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाने केले आहे.वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ‘अपने शान को मान नही, जब देश की शान बिखर जावे’ हा आत्यंतिक मोलाचा संदेश दिला होता. या वचनाला पाळून देशाच्या रक्षणासाठी जिवाची पर्वा न करता देशाचे प्रधान सेवक, प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आरोग्य सेवक, सुरक्षा सेवक, पत्रकार व अप्रत्यक्षरीत्या सेवा देणारी सेवक मंडळी आज संतांच्या वचनाप्रमाणे ‘अपने लिये जिता, वह जिना नही है, सेवा मे जो मरता वो मरना नही है’ या ओळीस अनुसरून कोरोना महासंकटाच्या विरोधात आपल्या जिवाची पर्वा न करता सेवा देत आहेत. राष्ट्रसेवकांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या सेवाकार्याला बळकटी मिळावी म्हणून यंदाचा ग्रामजयंती महोत्सव घरातच सुरक्षित राहून साजरा केला जाणार आहे.
राष्ट्रसेवकांसाठी कृतज्ञता व्यक्त करून साजरा होणार ग्रामजयंती महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 5:00 AM
दरवर्षी तीन दिवस हा महोत्सव ग्रामजयंती म्हणून हजारो अनुयायांच्या उपस्थितीत उत्स्फूर्तपणे साजरा केला जातो. यंदा कोरोनाच्या विश्वव्यापी संकटामुळे इतिहासात पहिल्यांदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची महासमाधी कुलूपबंद आहे. त्याच परिसरात दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो.
ठळक मुद्देराष्ट्रसंतांचा जन्मोत्सव सोहळा : कोरोनामुळे महासमाधी परिसर लॉकडाऊन