Gram Panchayat Election Result : काँग्रेस बाजीगर, सर्वाधिक सरपंच विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 02:11 PM2022-12-21T14:11:14+5:302022-12-21T14:12:49+5:30

आमदारांनी राखले गड : भाजप, प्रहार, शिवसेना, युवा स्वाभिमानसह स्थानिक आघाड्यांनीही उधळला गुलाल

Gram Panchayat Election Result Amravati: Congress is victorious, most sarpanchs won | Gram Panchayat Election Result : काँग्रेस बाजीगर, सर्वाधिक सरपंच विजयी

Gram Panchayat Election Result : काँग्रेस बाजीगर, सर्वाधिक सरपंच विजयी

googlenewsNext

अमरावती : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालीम या अर्थाने सर्वच राजकीय पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदांसाठी रंग भरला होता. यामध्ये काॅंग्रेसचे सर्वाधिक सरपंच निवडून आल्याने निर्विवाद बाजी मारली आहे. या पक्षाचे समर्थित सरपंचदेखील विजयी झाले आहेत. याशिवाय सर्वच आमदारांनी आपले गड काबीज केले आहेत. या निवडणुकीत भाजप, शिवसेना (उद्धव ठाकरे), प्रहार, युवा स्वाभिमानसह स्थानिक आघाड्यांनीही गुलाल उधळला आहे.

विजयानंतर काही सरपंच आमचाच म्हणून राजकारणात दावे केले जात आहेत. फक्त काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या नेत्यांनी दावा केलेल्या सरपंचांची संख्या ४०० च्या घरात आहे. जिल्ह्यात २५७ सरपंचपदांसाठी निवडणूक झालेली असताना एका सरपंचपदावर अनेक पक्ष दावा करीत असल्याचे दिसून येते.

जिल्ह्यात १४ ही तालुक्यांच्या मुख्यालयी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणी केंद्रांबाहेर मोठ्या संख्येने समर्थक उत्सुकतेने जमले होते. साधारणपणे प्रत्येक ग्रामपंचायतीचा निकाल अर्ध्या तासात बाहेर आल्यानंतर समर्थकांनी जल्लोष करायला सुरुवात केली, यावेळी जोरदार नारे देण्यात आले व गुलाल उधळत आतषबाजीमध्ये ढोल-ताशांच्या गजरात विजयी सरपंच व उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विजयी उमेदवारांची गावात मिरवणूकदेखील काढण्यात आली

दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात झालेल्या २५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीने ग्रामीण भागातील राजकारण ढवळून निघाले होते. यामध्ये सर्वच राजकीय पक्ष नाही-नाही म्हणता कामाला लागले होते. उमेदवारी अर्जाच्या माघारीनंतर फक्त आठ दिवस मिळाले असताना प्रचाराची रणधुमाळी उडाली व मंगळवारच्या मतमोजणीनंतर ग्रामीण भागात कोण बाजीगर, हे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत गावाच्या विकासासाठी काही स्थानिक युतीदेखील चर्चेत आल्या आहेत. यामध्ये भाजप-काँग्रेस, भाजप-राष्ट्रवादी, प्रहार यांच्या युतीमुळे काही सरपंच विजयी झाले आहेत.

‘कही खुशी...कही गम’

थेट जनतेमधून सरपंचपदाची निवडणूक असताना पाच गावांत एकमत झाल्याने बेलोना, जैनपूर, डवरगाव, सावंगी संगम, सावंगी बुजरुक, घोडचंदी व चिखली वैद्य येथे अविरोध निवडून आली. याशिवाय २४९ सरपंचपदांसाठी १००६ व १६५७ सदस्यपदांसाठी ३८९६ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये मंगळवारच्या निकालानंतर ‘कही खुशी... कही गम’चे चित्र दिसून आले.

बच्चू कडू यांचे बंधू, राजकुमार पटेल यांची पुतणी विजयी

चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा ग्रामपंचायत सरपंचपदी राज्यमंत्री तथा अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांचे बंधू भैया कडू मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. धारणी तालुक्यात झिल्पी ग्रामपंचायत सरपंचपदी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांची पुतणी अस्मिता नरेंद्र पटेल विजयी झाल्या आहेत.

तळणीत सरपंच पत्नी, तर पती सदस्य

मोर्शी तालुक्यातील तळणी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी पत्नी तर पतीराज सदस्य झालेले आहेत. सरपंच जयश्री राजेश पांडे व सदस्यपदी राजेश पांडे विजयी झाले. मतदारांनी पती-पत्नी दोघांवरही विश्वास व्यक्त केल्यामुळे ‘जिथे सरपंचपदी बाई तिथे पतिराज करतात घाई’ म्हणण्यास आता वाव राहिलेला नाही.

उमेदवार नकोच, ‘नोटा’लाच पसंती

अचलपूर तालुक्यात शहापूर ग्रामपंचायतीमध्ये वाॅर्ड क्रमांक दोनमधील दोन्ही उमेदवारांना मतदारांनी नाकारले. येथे कमल ताथोड यांना १३२ व प्रिया नितनवरे यांना १२० मते मिळाली. मात्र, ‘नोटा’ला सर्वाधिक १३५ मते असल्याने नियमाचा आधार घ्यावा लागला. यामध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते असणारा सदस्य विजयी झाला.

हिवरखेड प्रभाग ६ मध्ये दुबार मतमोजणी

मोर्शी तालुक्यातील हिवरखेड ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग सहामधील उमेदवार शारदा वाघमारे यांचा अल्प मतांनी पराभव झाला. त्यामुळे त्यांनी दुबार मतमोजणीची मागणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली, ती मान्य करण्यात आली. प्रत्यक्षात दुबार मतमोजणीमध्ये एकाही मताचा फरक पडलेला नाही.

चिखलदरा येथे मतमोजणीची संथ गती

जिल्ह्यात मतमोजणीची सर्वात संथ गती चिखलदरा तालुक्यात होती. या तालुक्यात सर्वाधिक २६ ग्रामपंचायतींची मतमोजणी होती. यामध्ये एक आरओ यांचा चिखलदराजवळ अपघात झाला. त्यामुळे तेथील सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे प्रभार देऊन प्रक्रिया आटोपण्यात आली. यामुळे वेळ लागल्याचे सांगण्यात आले.

अचलपूर पंचायत समितीच्या माजी सभापती आता सरपंच

१)अचलपूर तालुक्यात सावळी दातुरा ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदावर कविता अमोल बोरेकर विजयी झाल्या. २०१९ ते २०२२ या कालावधीत त्या पंचायत समितीच्या सभापती होत्या.

२) वरूड तालुक्यात आमदार देवेंद्र भुयार यांच्या गव्हाणकुंड ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांनी त्यांच्या कांमुजा गावात गड राखला आहे.

टपाली एका मताने जवर्डीचे सरपंच विजयी

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील जवर्डी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी दोन उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने पेच निर्माण झाला होता. मात्र, एका टपाली मतामुळे प्रमोद ढोक विजयी झाले. याशिवाय खिरगव्हाण येथे सरपंच संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांच्या पॅनलचा पराभव झाल्याचे सांगण्यात आले.

स्थानिक आघाडी, महाआघाडीला मोठे यश

गावच्या विकासासाठी स्थानिक राजकीय गटांनी युती केल्या. सर्वानुमते सरपंच व सदस्यांसाठी उमेदवार उभे केले होते. याशिवाय महाविकास आघाडी या बॅनरखाली सरपंचपदाचे उमेदवार रिंगणात होते. या आघाड्यांना यावेळी मोठे यश मिळाले आहे. कुठल्याही एक पक्षाचे नव्हे, तर आम्ही महाआघाडीचे सरपंच, असे त्यांनी अभिमानाने सांगितले.

Web Title: Gram Panchayat Election Result Amravati: Congress is victorious, most sarpanchs won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.