अमरावती: कोविड-१९ च्या अनुषंगाने निर्गमित मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून ग्रामसभा घेण्याबाबत परवानगी देण्यात आली होती. याबाबत तसे पत्रसुध्दा जारी केले होते. अशातच २० जानेवारी रोजी ग्रामविकास विभागाने जारी केलेल्या पत्रान्वये ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांना ३१ मार्चपर्यंत स्थगिती देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा परिषदेत धडकले आहेत. त्यामुळे आता नव्या आर्थिक वर्षातच ग्रामसभा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोरोनाच्या अनुषंगाने निर्गमित मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून ग्रामसभा घेण्याबाबत परवानगी दिली होती. राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये १५ जानेवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका झाल्या असून अद्याप सदर ग्रामपंचायतींच्या सरपंचाची निवड झालेली नाही. मुदत संपलेल्या बऱ्याच ग्रामपंचायतींच्या ठिकाणी प्रशासक नियुक्त करण्यात आलेले आहेत. यापैकी बऱ्याच प्रशासकाकडे एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतींचा कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रशासकास एकाच वेळी एकापेक्षा अधिक ठिकाणी ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषविणे शक्य होणार नाही. त्यामुळे ग्रामसभा घेणे परिणामकारक ठरणार नाही. तसेच अद्यापही कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरू असून काही प्रमाणात कोरोनाचे सावट कायम आहे. ही बाब लक्षात घेता ग्रामसभांना ३१ मार्चपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
बॉक़्स
नव्या आर्थिक वर्षात ग्रामसभा !
चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी आता दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे नवे शासकीय आर्थिक वर्ष एप्रिल महिन्यानंतर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.