अमरावती : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ७ अन्वये २ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणाऱ्या ग्रामसभा घेण्याबाबत ग्रामविकास विभागाने २३ सप्टेंबर रोजी आदेश जारी केले आहेत. याबाबत जिल्हा परिषद सीईओंना आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार येत्या २ ऑक्टोबर या महात्मा गांधी जयंतीदिनी जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींमध्ये बहुप्रतीक्षेनंतर पहिल्यांदा ग्रामसभा होणार आहे. विशेष म्हणजे ही ग्रामसभा ऑनलाइन किंवा ऑफलाइन घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९च्या कलम ७ अन्वये ग्रामसभा आयोजित केली जाते. तथापि कोविड -१९च्या आजाराच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभा आयोजित करावी किंवा कसे याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून ग्रामविकास विभागाकडे मार्गदर्शन मागविले होते. त्यानुसार ग्रामविकास विभागाने राज्य शासनाच्या आदेशान्वये कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंध करणे, अनुषंगाने यापूर्वी घालण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. ही लक्षात बाब घेता. ग्रामसभा घेतेवेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे व त्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याच्या अटीस अधीन राहून ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांना परवानगी देण्यास ग्रामविकास विभागाने हिरवी झेंडी दिली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींमध्ये २ ऑक्टोबर रोजी ग्रामसभा होणार आहेत. परिणामी ग्रामसभाअभावी रखडलेल्या प्रस्तावांचा यामुळे मार्ग मोकळा होणार आहे.